गणेशोत्सावासाठी यंदा कोकणात 2200 जादा बसेस सोडणार
गणेशोत्सावासाठी कोकणात जायचं असेल तर १६ जुलैपासून आरक्षण सुरु करण्यात येणार आहे.
मुंबई : कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जवळचा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 2200 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून 4 सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. 14 सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला निघणार आहेत.
कोकणात जाण्यासाठी 16 जुलैपासून या बसेसचे परतीच्या प्रवासाचे आरक्षण सुरु होईल, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.
गणपती उत्सवात अनेक कोकणवासीय एसटीने कोकणात जातात. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जादा बसेस सोडल्या जातात. गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. मात्र, यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतुक केल्या जाणार असून प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.