समृद्धीवर अग्नितांडव! बससह प्रवाशांचा कोळसा, ओळख पटवणार कशी? पोलिसांसमोर हा एकच मार्ग
Samruddhi Highway Bus Accident Today: समृद्धी महामार्गावरचा आजवरचा सर्वात मोठा आणि मन सून्न करणारा अपघात घडला आहे. डिव्हायडरला धडकून बसने पेट घेतला. यात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
Buldhana Bus Accident: शनिवारची सकाळ संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुखःद ठरली आहे. समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, आठ जण बचावले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की बसने पेट घेतल्यानंतर प्रवाशांना बाहेर पडण्यासही संधी मिळाली नाही. त्यामुळं आतच प्रवासी होरपळले आहेत. दरम्यान, अपघातग्रस्त बसमधील मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजानजीक पिंपळखुटा या गावानजीक समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खासगी बसचा मध्यरात्री १ ते दोनच्या सुमारास अपघात झाला आहे. बसचा टायर फुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. तर, टायर फुटल्याने ही बस डिव्हायडरला जाऊन धडकली व पलटी झाली. या धडकेत बसची डिझेल टँक फुटली. डिझेल टँक फुटल्याने एकच भडका उडाला.
समृद्धी महामार्गावर आजवरचा मोठा अपघात, काय घडलं नेमकं?
बस धडकल्याने आगीचा एकच भडका उडाला आणि क्षणार्थात बसने पेट घेतला. बस दरवाजाच्या बाजूने उलटल्याने प्रवाशांना बाहेर पडण्यास उशीर झाला. तर, मध्यरात्रीच्या सुमारास अपघात घडल्याने प्रवाशांना बस बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. तर, आगीने पेट घेतल्याने अवघ्या काही क्षणातच संपूर्ण बस जळून खाक झाली. तर, आतमधील प्रवाशांचाही जळून कोळसा झालाय. अशावेळी पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवणे कठिण झालं आहे.
अपघातग्रस्त बसमधील मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम आव्हानात्मक असणार आहे. पोलिसांनी बसमधील मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात नेले आहेत. तसंच, मृत प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्टशिवाय पर्याय नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसंच, ही बस नागपुरातून निघाली होती. त्यामुळं ट्र्रॅव्हल्सच्या बुकिंग ऑफिसमधून प्रवाशांची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
बुलढाण्यात भीषण अपघात; समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स पलटली; 26 जणांचा होरपळून मृत्यू
अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांचे मोबाईलदेखील आणि कागदपत्रेदेखील जळून खाक झाले आहेत. त्यामुळं त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्कदेखील होऊ शकत नाहीये. बसमध्ये नागपूर, वर्धा, यवतमाळजिल्ह्यातील सर्वाधिक प्रवासी होते. बसमध्ये वर्धा जिल्ह्यातील 14 प्रवासी होते.
दरम्यान, बसमध्ये दोन चालत होते. त्यातील एका चालकाचा मृत्यू झाला आहे. तर, एक चालक बचावला आहे. तसच, काही प्रवासी बसच्या कॅबिनमध्ये बसले होते ते देखील बचावले आहेत. अपघातानंतर, काही जणांना खिडकीच्या काचा तोडून बाहेर पडण्यात यश आले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. तसंच, या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत सरकारकडून जाहिर करण्यात आली आहे.