बुलढाण्यात भीषण अपघात; समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स उलटली; 25 जणांचा होरपळून मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावरील आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात. सिंदखेडराजा नजीक ट्रॅव्हल्स पलटी होऊन जळाली. या अपघातात तब्बल 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू  

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 1, 2023, 08:25 AM IST
बुलढाण्यात भीषण अपघात; समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स उलटली; 25 जणांचा होरपळून मृत्यू title=
Several feared dead as bus catches fire on Samruddhi Mahamarg Expressway buldhana

बुलढाणाः समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) अपघातांचे सत्र अद्याप सुरूच आहे. महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वात भयंकर अपघात सिंदखेडराजानजीक घडला आहे. ट्रॅव्हल्सपटली होऊन जागीच पेट घेतला. या अपघातात बसमध्ये झोपलेल्या 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. (Buldhana Samruddhi Mahamarg Accident)

या अपघातात ट्रॅव्हल्स बस दुभाजकाला धडकली त्यानंतर पलटी होऊन ट्रॅव्हलने पेट घेतला. अपघातात बसमध्ये झोपलेल्या प्रवाशांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला. तब्बल एक ते दीड तास चाललेल्या या अग्नीतांडवात 25 जणांनी जीव गमावला आहे. रात्रीची वेळ असल्याने त्यांना वाचवायला त्यांच्यापर्यंत कोणीही पोहोचू शकले नाही. ट्रॅव्हलच्या केबिनमध्ये बसलेले काही जण आणि काही प्रवासी यात बचावले असल्याची शक्यता आहे. 

मध्यरात्री 2च्या सुमारास हा अपघात घडला असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातग्रस्त बस ही नागपूरहून पुण्याला जाणारी होती. बुलढाण्यातील सिंदखेडराजानजीक पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावर हा अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण आहे की बस संपूर्ण जळून खाक झाली आहे. 

पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावर रस्ता दुभाजकाला बस धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला. मात्र रात्रीच्या सुमारास कोणालाच ही बाब लक्षात आल्याने प्रवाशांना वाचवण्यासाठी तात्काळ मदत मिळू शकली नाहीये. प्रवासी झोपेत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. 

अपघात झालेली बस ही विदर्भ ट्रॅव्हल्सची असून यात एकूण 33 प्रवासी होते. ट्रॅव्हलच्या केबिनमध्ये बसलेल्या काही जणांना बसमधून बाहेर पडण्यात यश आलं असून एकूण ७ जण बचावले आहे. नागपूरहून पुण्याला ही बस निघाली होती. तर बसमध्ये असलेले बहुंताश प्रवासी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय.