जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : जुलै महिन्यात सुरु होणाऱ्या हज यात्रेसाठी महाराष्ट्र हज समितीने तयारी पूर्ण केली असून यावेळी हज यात्रेकरूंसाठी व्यवस्थेत काही बदल करण्यात आले आहेत. हज यात्रेकरूंना हज हाऊसमध्ये विश्रांती थांबा न देता त्यांना थेट विमानतळावरच सोडण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हज यात्रेकरूंच्या सुविधेसाठी यावेळी 'हाजी मित्र' तयार करण्यात येणार असून या हाजी मित्रांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे हाजी मित्र हज यात्रेकरूंना त्यांच्या घरापासून ते विमानतळापर्यंतच्या प्रवासाकरिता मदत करतील. राज्यातून मुंबई, नागपूर, औरंगाबाद विमानतळाहून हाजी जेद्दाहसाठी रवाना होतील. नागपुरातुन  १५ विमाने उड्डाण करतील. पूर्ण विदर्भातून २४७५ यात्री हजसाठी रवाना होणार आहेत. तसेच मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यातील हाजी देखील नागपूर विमानतळाहून जेद्दाहसाठी जातील.


विदर्भातून जाणाऱ्या यात्रेकरूंचे ऑनलाईन रिपोर्टिंग करण्यात येणार आहे. त्यांच्या प्रवासाची कागदपत्रे अगोदरच त्यांना दिली जाईल. त्यानंतर साहित्य स्कॅनिंग करून विमातळावर पोहचविण्यात येईल. त्यानंतर यात्रेकरू सरळ विमानतळावर पोहचतील. या नवीन सुविधेमुळे यात्रेकारुना अधिक त्रास होणार नाही व वेळेची देखील बचत होणार असल्याची माहिती जमाल सिद्दिकी यांनी यावेळी दिली.


काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात हज यात्रेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप जमाल सिद्दिकी यांनी यावेळी केला. मुंबईत हज समितीचे स्वतःच्या मलिकचे कार्यालय नसून धर्मशाळेतून हज समितीला कार्यभार चालवावा लागत असल्याची टीका सिद्दिकी यांनी यावेळी केली. केंद्र सरकारच्या प्रयत्नांनी यावेळी २५ हजार यात्रेकरू भारतातून हज यात्रेसाठी जाणार असून ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या राहणार असल्याचेही सिद्दिकी यांनी यावेळी म्हटलं आहे.