आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भोयेगाव जवळ अश्मयुगीन अवजारे सापडली आहेत.  मध्यपाषाण युगातील आदिमानवांची ही अवजारं भूशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी शोधून काढली आहेत. आर्कीयन काळातील रुपांतरीत खडकापासून बनलेली असून त्यात अर्ध मौल्यवान समजल्या जाणाऱ्या जास्पर ,अगेट, क्वार्ट्झ या खडकांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्धा नदीच्या किनारी असलेल्या जंगलात सापडले अवशेष


चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील वर्धा नदीच्या किनारी असलेल्या भोयेगाव जवळ शेती आणि जंगल परिसरात 25,000 वर्षादरम्यानच्या मध्यपाषाण (Mesolithic) युगातील आदिमानवांची अवजारे येथील भूशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी नुकतीच शोधली आहेत. चंदपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशी अवजारे मिळाली असली तरी ह्या परिसरात प्रथमच अश्या प्रकारची मध्याश्मयुगीन अवजारे मिळाली आहेत. 


भोयेगाव येथे आढळलेली ही अवजारे आर्कीयन काळातील रुपांतरीत खडकापासून बनलेली असून त्यात अर्ध मौल्यवान समजल्या जाणाऱ्या जास्पर ,अगेट,क्वार्ट्झ ह्या खडकांचा समावेश आहे. विदर्भ आणि विशेषता चंद्रपूर जिल्हा हा पाषाणयुगात विशेषता हिमयुगात जास्त लोकसंख्या असलेला प्रदेश होता हे अनेक ठिकाणी आढळलेल्या अवजारावरून लक्षात येते. अश्मयुगात मानव नदीकिनारी राहत असे.


भोयेगाव परिसरात नदीकिनारी आढळणारे  खडक हे 150 कोटी वर्षाच्या आर्कीयन काळातील असून ते रुपान्तरीत प्रकारात मोडतात. हे खडक ह्या परिसरात हिमयुगात वाहून आलेले,गाल मिश्रित अल्लूवियम, असून त्यात  लहान गोल खडक आढळतात. हे खडक 40,000 ते 25,0000 वर्षादरम्यान वाहात आलेले आहेत ह्यात क्वार्टझाईट,अगेट,क्वार्ट्झ,जास्पर हे खडक अतिशय टणक आणि मजबूत असून अश्म अवजारांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. म्हणूनच अश्मयुगातील लोकांना क्वार्टझाईट मँन असे म्हटल्या गेले. भोयेगाव जवळील अवजारात पूर्व पाषाण युगात वापरात असलेली खूप मोठ्या आकाराचचे अवजारे नाहीत तर लहान आकाराची हात कु-हाड,आणि ब्लेड्स जास्त प्रमाणात आढळतात.