वेगवेगळ्या २ घटनांत ३ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी आपल्या पाल्यांना पाण्यापासून रोखण्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
रायगड / लोनावळा: रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील शेत तळ्यात दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कर्जतच्या आंबिवली गावानजीक पेठ रस्त्यावरील शेत तळ्यात पोहायला गेलेल्या अक्षय प्रकाश खेडेकर आणि प्रतीक अशोक पिंपरकर या मुलांचा बुडून मृत्यू झाला. मत्स्य शेतीच्या शेत तळ्यात टाकलेल्या प्लास्टिक मुळे या मुलांना पाण्या बाहेर येता आले नाही आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे.
बंधाऱ्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
दरम्यान, दुसऱ्या घटनेत लोणावळ्याजवळील कामशेत येथील इंद्रायणी नदीच्या बंधाऱ्या जवळ पोहण्यासाठी आलेल्या एका शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर या विद्यार्थ्यांचा मृतदेह शोथपथकाला रविवारी दुपारी सापडला. प्रथमेश दिपक साळुंखे हा १४ वर्षीय मुलगा शाळेतून परस्पर कामशेत येथिल इंद्रायणी नदीमध्ये पोहण्यासाठी आला होता. पोहत असतानाच तो पाण्यात बुडाला.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी आपल्या पाल्यांना पाण्यापासून रोखण्याची काळजी घेणे गरजेचे आहे.