Ganeshotsav 2023:  लाडक्या गणपती बाप्पाचा उत्सव म्हणजे कोकणी माणसाचा जीव की प्राण. दरवर्षी गणपतीला फूल वाहायला कोकणी चाकरमान्यांची पावलं वळतात ती गावच्या लाल मातीकडं. सहा महिने आधीच गणपतीचं बुकिंग सुरू होतं. मात्र, अवघ्या काही सेकंदात कोकण रेल्वेची तिकीटं फुल्ल झाल्यानं कोकणी माणसाच्या पदरी पडते ती निराशा. मग एसटी किंवा खासगी ट्रॅव्हल्सच्या बसगाड्यांचा पर्याय शोधला जातो. मात्र ट्रॅव्हल्सचे रेट या काळात गगनाला भिडतात. कोकणी माणसाचा हाच वीक पॉईंट राजकीय पक्षांनी बरोबर हेरलाय. त्यामुळंच गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणात गावी जाणा-या चाकरमान्यांसाठी राजकीय नेत्यांकडून फुकट प्रवासाची सोय करून दिली जाते. अर्थातच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी ही सगळी मतांची बेगमी असते.


कोकणात जाण्यासाठी 300 खासगी बसेस, 2 मोदी एक्स्प्रेस ट्रेन आणि 4 कोकण स्पेशल ट्रेन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या वर्षी मुंबई भाजपकडून कोकणात जाण्यासाठी 300 खासगी बसगाड्या सोडल्या जाणार आहेत. त्याशिवाय मुंबईहून 2 मोदी एक्स्प्रेस ट्रेन आणि 4 कोकण स्पेशल ट्रेन सोडल्या जाणार आहेत. त्याशिवाय शिवसेना शिंदे गटाकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 12 ते 18 खासगी बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.


खरं तर गणेशोत्सवात अशी फुकट प्रवासाची सोड करण्यापेक्षा खरी गरज आहे ती मुंबई गोवा महामार्गाचं काम तातडीनं पूर्ण करण्याची. पाठीमागून काम सुरु होऊन समृद्धी महामार्ग सुरुही झाला. मात्र गेल्या 17 वर्षांपासून कोकणात जाणा-या मुंबई-गोवा हायवेचं काम रखडलंय. खड्ड्यांमुळं या रस्त्याची पुरती चाळण झालीय. चंद्रावरच्या खड्ड्यांपेक्षा मुंबई गोवा हायवेवर जास्त खड्डे असल्याची टीका होतेय. दरवर्षी गणेशोत्सवाच्या आधी हायवे पूर्ण करण्याचं आश्वासन सरकारकडून दिलं जातं आणि गणपतीसोबतच सरकारच्या आश्वासनाचंही विसर्जन होतं. 


यंदाही सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाणांनी गणपतीपूर्वी हायवेची एक लेन सुरू करण्याची घोषणा केली. मात्र, गणपतीला अवघे पाच दिवस उरलेत आणि हायवेवरचे खड्डे अजूनही दुरूस्त झालेले नाहीत. कोकणातल्या एकाही नेत्याकडं राजकीय इच्छाशक्ती नसल्यानंच हायवेचं काम रखडलंय, हे कटू वास्तव आहे.. त्यामुळं फुकट प्रवासाच्या भूलथापांना बळी न पडता आगामी निवडणुकीत कोकणी माणसांनी अशा नेत्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. कोकणी माणूस हे शस्त्र हाती घेणार की, यापुढंही थंडपणानं खड्ड्यांतून दहा-दहा तास प्रवास करत राहणार? बाप्पा, कोकणी माणसाला तूच काय ती सद्बुद्धी दे आता.