मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३१ वर गेलीय. राज्यातल्या ९ शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेत. यात सर्वात जास्त रुग्ण पुण्यात आहेत. त्या खालोखाल मुंबई, नागपूर शहरात कोरोनाचे रुग्ण आढळलेत. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, कामोठेत प्रत्येकी एक रुग्ण आढळलाय. तर यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाची लागण झालीय. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानं राज्य सरकारची आणि आरोग्य विभागाची चिंता वाढलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत परदेशातून आलेल्या नागरिकांमध्येच कोरोनाची लक्षणं आढळलीयत. पण त्यांच्या मार्फत कोरोनाची इतरांना लागण होऊ नये याची दक्षता सरकारला घ्यावी लागणार आहे.आज जे नऊ रूग्ण नव्याने आढळले आहेत त्यातील ४ जण पुणे इथल्या पहिल्या २ बाधीत रूग्णांसोबत दुबईला सहलीला गेल्या गटातले आहेत. 


कोरोनाच्या रूग्ण संख्येत सध्या देशात महाराष्ट्र राज्य दुसऱ्या स्थानावर आहे. सर्वाधिक रूग्ण केरळात आढळले आहेत.



शाळा, महाविद्यालयं ३१ मार्चपर्यंत बंद


राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय शासनाने दिला आहे. यामध्ये खासगी आणि सरकारी शाळांचा समावेश असेल. असे असले तरी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरु राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. काल पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळा बंद करण्याचा निर्णय झाला होता. राज्यातील शाळा बंद करण्यासंदर्भात वारंवार मागणी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.


यवतमाळमध्ये दोन रुग्ण 


यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळून आलेत. दोन्ही कोरोनाचे रुग्ण दुबईला गेलेल्या गटातील सदस्य होते. १ मार्चला यवतमाळमधील नऊ जणांचा गट दुबईहून परतला होता. नऊ जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठवण्यात आले होते. यातल्या दोघांचे नमुने पॉझिटीव्ह आलेत. दोघांवरही नागपूरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.