नाशिक: लासलगाव बसस्थानकात शनिवारी महिलेवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. मात्र, आता या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे. पोलिसांनी या घटनेनंतर तातडीने कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या रामेश्वर भागवतलाही पोलिसांनी अटक केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, रामेश्वरने स्वत:वरील आरोप फेटाळून लावले आहेत. या सगळ्यात माझी काहीही चूक नाही. संबंधित महिलेनेच मला लग्न करण्याची गळ घातली. मात्र, मी लग्नाला नकार दिल्याने ती संतापली होती. शनिवारी तिने माझ्याशी लग्न करतोस की अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेऊ, अशी धमकी दिली. तरीही मी नकार दिल्याने तिनेच स्वत:ला जाळून घेतले, असा दावा रामेश्वर भागवतने केला. त्यामुळे नेमकं तिला पेटवलं गेलं की तिने स्वत:च पेटवून घेतलं, याबद्दल तपास करणाऱ्या पोलिसांनाही शंका आहे.


मुख्यमंत्र्यांनी भेट घेत लासलगाव पीडितेला दिला धीर, दोघे ताब्यात


रामेश्वर भागवत आणि संबंधित महिलेचे गेल्या काही दिवसांपासून संबंध होते. महिलेच्या पतीचे निधन झाले असून तिने रामेश्वरशी दोन महिन्यांपूर्वी वाकडच्या रेणुका मंदिरात विवाह केला होता. परंतु, रामेश्वर याचा साखरपुडा नातेसंबंधातीलच मुलीशी झाल्याने या दोघांमध्ये वाद सुरू होता. सायंकाळी ही महिला आपल्या एका सहकाऱ्यासोबत बसस्थानकात उभी होती. याचवेळी तेथे रामेश्वर आल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यातून जवळ असलेले बाटलीतील पेट्रोल दोघांनी आपल्या अंगावर शिंपडून घेत स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला.


या घटनेत ही महिला ६७ टक्के भाजली आहे. तिची प्रकृती सध्या गंभीर आहे. सुरुवातीला तिच्यावर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, पहाटेच्या सुमारास तिची प्रकृती खालावली. त्यामुळे तिला अधिक उपचारासाठी मुंबईच्या मसीना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.