सासू नाही आई! चार सुनांकडून अंत्ययात्रेदरम्यान सासुला खांदा
कुटुंबियांसोबत त्यांनी दिलेले संस्कार आहेत.
सोलापूर : हल्ली सासूला आई म्हणण्याची पद्धत सुरु झाली आहे. काही जण त्या शब्दानुसार सासुसोबत वागतात. तर बाकी सुना फक्त म्हणायचं म्हणून सासूला आई म्हणतात. पण सोलापुरातील बार्शीत असं काही घडलंय, ते वाचून तुम्हीही म्हणाल, या सासू-सुना नाही तर, आई लेकीच. (4 daughters in law give shoulder to mother in law in barshi solapur)
तर झालं असं की बार्शीत बुधवारी 4 ऑगस्टला दमयंती मुंढे याचं वयाच्या 70 व्या वर्षी देहावसन झालं. साधारणपणे मृत्यू झाल्यानंतर घरातील पुरुषवर्ग अंत्य यात्रेदरम्यान खांदा देतात. पण या चारही सुनांचा आपल्या सासूवर इतका जीव होता की त्यांनी आपल्या सासूला खांदा दिला. या सर्व प्रकारामुळे या सुनांची सध्या वाह वाह होत आहे.
दमयंती मुंढे यांचा अध्यातमाकडे ओढा होता. फक्त ओढाच नव्हता तर त्यानुसार वागायच्याही. आपल्या सुनांना त्या मुलींप्रमाणे वागणूक द्यायच्या. त्यांनी या आपल्या सुनांना मुलीसारखं वागवलं. 'पेराल तसं उगवतं' या म्हणीनुसार सासूने जीव लावला. त्यांनी प्रेमाची पेरणी केली. त्याच्या दुप्पटीने सासूबाईंना त्यांच्या सुनांनी जीव लावला.
दमयंती मुंढे यांना अध्यात्माची ओढ होती. त्या संगतीचा चांगला परिणाम हा सुनांवर झाला. दमयंती मुंढे या आपल्या सुनांना चांगल्याच गोष्टी सांगायच्या. संसारासोबत त्यांनी अध्यात्माचीही कास धरली होती. त्यामुळे त्यांनी जगताना प्रत्येकाला मायेने वागवलं.
दमयंती मुंढे या आता त्यांच्या घरच्यांसह नाहीत. पण कुटुंबियांसोबत त्यांनी दिलेले संस्कार आहेत. त्यामुळे त्या जरी देहाने त्यांच्या मुलांबाळांसोबत नसल्या तरी संस्काराच्या रुपातून त्या नक्कीच त्यांच्यात असतील.
सासऱ्यांकडून परवानगी
आपल्याकडे सहसा महिला खांदा देत नाहीत. पण या सूनांनी आपल्या सासूबाईंना खांदा द्याचाच होता. अशावेळेस त्यांच्या सासऱ्यांनी सासूबाईंना खांदा देण्याची परवानगी दिली.