नांदेड : जिल्ह्यात पावसाने चार बळी घेतले आहेत. मांजरम गावाजवळ ओढ्यात तवेरा वाहून गेली आहे. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. गंगाधर दिवटे, पारूबाई दिवटे, अनुसया दिवटे या तिघांचा यात मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाय. तर आणखी एका घटनेत ओढ्यात तरूण वाहून गेला. तिघे मयत नायगाव तालुक्यातील बरबडा गावचे रहिवाशी आहेत. गावकऱ्यांच्या मदतीने तवेरा गाडी आणि त्यातले आणखी तीन जण बाहेर काढण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


जिल्ह्यात संततधार पाऊस सुरुच आहे. संपूर्ण जिल्ह्यात पावसाची झड कायम आहे. पावसामुळे नांदेड शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. मुख्य मार्गांवर मोठया प्रमाणात पाणी साचलं आहे. साचलेल्या या पाण्यातून नांदेडकरांना मार्ग काढावा लागतोय. रस्त्यांसह शहरातील अनेक सखल भागांमध्ये देखील पाणी साचलं आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. सखल भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली असतांना पालिकेची यंत्रणा मात्र गायब आहे. 


दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. १ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात १०४२ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. हा पाऊस सरासरीच्या १०६ % एवढा आहे. सध्या दक्षिण गडचिरोलीत भामरागड अंडी मुलचेरा या भागात तुफान पाऊस कोसळत असल्याने सर्व प्रमुख मार्ग बंद झाले आहेत.


येत्या ४८ तासांत मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता काही अंशी कमी होणार आहे. केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तसंच मागच्या आठव्ड्यात उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबारच्या विसरवाडीत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याचा हा अंदाज महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा असला तरी अतिवृष्टीचा इशारा नाही हे लक्षात घ्यावं.