अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : माणसाच्या निर्दयीपणाची धक्कादायक घटना पुण्यात समोर आलीय. बाणेर परिसरात २० भटक्या कुत्र्यांचं हत्याकांड घडणवण्यात आलंय. त्यातील ४ कुत्र्यांना जिवंत जाळण्यात आलय, तर १६ कुत्र्यांना विष घालून मारण्यात आलंय. पुण्यातील चतुःश्रुं गी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलीय . 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतस्ततः पसरलेले मृतदेह... काहींचे सांगाडे झालेले तर काही सडण्याच्या अवस्थेत... काहींना विष घालून मारलंय तर काहींना जाळून संपवलं...ते दृश्य नुसतं डोळ्यासमोर आलं तरी कुणाचंही काळीज हेलावेल.. कुत्री होती म्हणून काय झालं, त्यांचा अशा पद्धतीनं काटा काढायचा ? पण हे घडलय.... 
   
पॅनकार्ड क्लब परिसरात मागील गुरुवारी हा भयानक प्रकार उघडकीस आला.याठिकाणी तब्बल २० भटकी कृत्री मारण्यात आलीय. याप्रकरणी प्राणीप्रेमी कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे धाव घेतलीय. कुत्र्यांचा अशा पद्धतीनं जीव घेणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केलीय. मारून टाकण्यात आलेल्यापैकी ४ कुत्र्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यांनतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. 


भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या ही पुण्यामध्ये महत्वाची समस्या आहे. कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून त्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न होतात. मात्र ते विविध कारणांनी अपुरे आहेत. अशावेळी भटक्या कुत्र्यांपासून त्रस्त असलेले लोक त्यांना मारण्याचा उपदव्याप करतात.  ते खूपच क्रूर स्वरूपाचं आहे. दरम्यान या कुत्र्यांना मरणाऱ्यांची ठोस माहिती देणाऱ्याला ह्युमन सोसायटी इंटरनेशनल या संस्थेतर्फ़े ५० हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलय. त्यासाठी 9850089239 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन पुण्यातील एनिमल वेल्फेअर अधिकारी मेहर मथानी यांनी केलय.