ड्रग्ज प्रकरणात तरुणाला अडकवण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न CCTV मध्ये कैद; स्वत:च्या खिशातून पुडी काढून..
Mumbai Police CCTV Video: हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाईचा बडगा उचलला आहे. पोलीस खात्याने या चारही कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असून त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
Mumbai Police CCTV Video: तुम्ही सलमान खानचा 'वॉण्टेड' चित्रपट पाहिला आहे का? या चित्रपटामधील एका दृष्यामध्ये भ्रष्टाचारी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणारे महेश मांजरेकर सलमानची तपासणी करताना त्याच्या खिशात अंमली पदार्थांची पुडी टाकून त्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करतात. आता हा सीन चित्रपटामधील असला तरी मुंबईमध्ये खरोखरच असा प्रकार घडला असून तो सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. हे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. यामध्ये एक पोलीस उपनिरिक्षक आणि तीन हावालदारांचा समावेश आहे.
काय आहे या व्हिडीओमध्ये?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दोन पोलीस कर्मचारी एका झोपडीवजा हॉटेलमध्ये येतात. तेथे बसलेल्या एका व्यक्तीला उभं राहण्यास सांगून त्याची झडती घेतात. आधी एक जण या व्यक्तीची झडती घेताना पॅण्टचे मागचे खिसे तपासण्यासाठी त्याच्या पाठीच्या बाजूला जातो. त्यावेळी दुसरा पोलीस त्याची समोरु झडती घेत असतो. पॅण्टचे खिसे तपासणारा पोलीस कर्मचारी त्याच्याच पॅण्टच्या मागच्या डाव्या खिशातून एक पुडी काढून ती या व्यक्तीच्या पॅण्टच्या मागच्या खिशात ठेवतो.
पोलिसांनी आधीच दिली होती अडकवण्याची धमकी
या पोलिसांनी सदर व्यक्तीला आपण खार पोलीस स्टेशनमधील दहशतवादी विरोधी पथकाचे सदस्य असल्याचं सांगितलं. कलिना परिसरामध्ये ही कथित छापेमारी करताना त्यांनी शुक्रवारी सायंकाळी डॅनिअल नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डॅनिअलने पोलिसांनी आपल्याला पूर्वीच खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली होती. अंमली पदार्थ प्रकरणामध्ये (NDPS) तुला अडकवू असं पोलिसांनी धमकावल्याचा दावा डॅनिअलने केला.
1)
2)
चौघेही निलंबित
"मुंबई पोलिसांनी या व्हिडीओ प्रकरणामध्ये तातडीने कारवाई केली असून सर्व सहभागी पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. पोलीस खात्याकडून या प्रकरणाची अंतर्गत चौकशी केली जाईल," असं डीसीपी राज तिलक रोशन यांनी सांगितलं आहे. तसेच या पोलीस कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीने छापा टाकून झडती घेतली तशा पद्धतीने पोलीस कारवाई करत नाहीत, असंही रोशन यांनी सांगितलं. यापूर्वी या चौघांनी किंवा चौघांपैकी कोणीही अशापद्धतीने कोणाला अडकवलं आहे का? नेमका हा वाद काय होता? त्यांनी असं का केलं यासंदर्भातील तपशील सध्य ापोलीस गोळा करत आहेत.