मुसळधार पावसामुळे विदर्भात पुराचे संकट; पुण्यातून NDRFची चार पथके नागपूरला रवाना
पावसाचा जोर ओसरत नसल्याने येथील धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पुणे: राज्यभरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे काही भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा विदर्भातील अनेक भागांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या भागातील धरणे भरल्याने नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे धरणांच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता.
मात्र, पावसाचा जोर ओसरत नसल्याने येथील धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी पुण्यातून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या NDRF चार टीम्स नागपूरच्या दिशेने रवाना झाल्या. नागपूर आणि चंद्रपूर परिसरातील पुरस्थिती असलेल्या भागांत ही पथके तैनात करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
अमरावती-वर्धा जिल्ह्याला जोडणारा पुलही पाण्याखाली
अमरावती जिल्ह्यात गुरूवारी रात्री पासून सुरू असलेला पाऊस शनिवारी दुपारपर्यंतही कायम असल्यामुळे सर्वच धरणांचा जलसाठा वाढला असल्याने सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणासह सहा धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहे. तिवसा तालुक्यातल्या कौंडण्यपूर जवळून वाहणार्या वर्धा नदीला धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पुर आल्याने अमरावती - वर्ध्याला जोडणार पूल पाण्याखाली गेला असल्याने येण्या जाण्यासाठी मार्ग बंद झाला आहे. तर गेल्या २४ तासांपासून तिवसा तालुक्यातील नमस्कारी गावाचा संपर्क तुटला आहे.
चंद्रपूरात वैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी
वैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आष्टी-चंद्रपूर मार्ग बंद, चंद्रपुरचा दक्षिण गडचिरोली सोबत असलेला संपर्क खंडीत झाला आहे. गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने गोसेखुर्दचे पाणी सोडले असल्याने वैनगंगेच्या पात्रात पाणी वाढले. त्यामुळे आष्टी नदीवरील पूल उंच नसल्याने त्यावर रात्री दोन वाजल्यापासून पुलावरून पाणी वाहायला सुरुवात झाली. त्यामुळे वाहनांची ये-जा बंद करण्यात आली.