बीड : गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळांच्या वर्गणीची नेहमीच चर्चा होते. वर्गणीतून अनेक मंडळं आकर्षक देखावे, रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रम यावर पैशांची उधळण करताना बघायला मिळतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, बीड जिल्ह्यातील एका गावात एका मंडळाने वर्गणीतून मिळालेल्या पैशांच्या मदतीने कौतुकास्पद काम केलं आहे. 


बीड जिल्ह्यातल्या टोकवाडी गावच्या गणेश मंडळाने खास उपक्रम राबवत गावात सार्वजनिक शौचालयं उभारुन गाव हागणदारीमुक्त करायचा निर्धार केला आहे. या गावात एक गाव एक गणपती सारखा उपक्रम अनेक वर्षांपासून राबवला जातो. तसेच दरवर्षी या मंडळाकडून सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदा गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी टोकवाडी गावात चार सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आली आहेत.


यावर्षी गणेश मंडळाने गावात तब्बल दीड लाख रुपय खर्च करुन चार सार्वजनिक शौचालयं बांधली आहेत. या मंडळात शंभरहून अधिक सदस्य आहेत. सदस्यांनी आणि गावकऱ्यांनी मिळून एक लाख ७५ हजार रुपयांची वर्गणी जमा केली. त्यातून दीड लाख रुपये खर्च करुन शौचालयं उभारली. गावात आता शौचालयं उपलब्ध झाल्याने महिलांना मोठा फायदा होत आहे. गाव रोगराईमुक्त होण्यास मदत होत आहे.