नाशिक : देशासह महाराष्ट्रातही कोरोनाचा कहर सुरुच आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दुसरीकडे कोरोना रुग्ण बरे होत असल्याची दिलासादायक बाबही आहे. कोरोनाचा अधिक धोका ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना अधिक असल्याचं बोललं जातं. मात्र ज्येष्ठांसह लहान मुलंही कोरोनावर मात करत असल्याचं समाधानकारक चित्र आहे. नाशिकमध्ये अशाच एका चिमुकलीने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोनाला हरवल्यानंतर या चिमुकलीला रुग्णालयातून अनोख्यारितीने निरोप देण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमध्ये पाच वर्षांच्या एका मुलीला कोरोनाची लागण झाली होती. 16 दिवसांच्या उपचारानंतर ही मुलगी कोरोनातून पूर्णपणे बरी झाली. तिने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. रुग्णालयातून बाहेर पडताना ही चिमुकली हातात जादूची छडी घेऊन परीच्या वेशात बाहेर पडली. 


त्यावेळी चिमुकलीवर रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी फुलांचा वर्षाव करत तिला निरोप दिला. या चिमुकलीचा कोरोनाला हरवण्याचा हा यशस्वी प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आणि तितकाच दिलासादायक ठरत आहे.


कोरोनातून ज्येष्ठ नागरिकही पूर्णपणे बरे होत असून घरीदेखील जात आहेत. काही दिवसांपूर्वी धुळ्यातील एका 70 वर्षांच्या आजीने कोरोनावर यशस्वी मात केली होती. त्याचंदेखील त्यांच्या परिसरात टाळ्या वाजवून, फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आलं होतं.