नागपूर : नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. देव दर्शनासाठी आलेल्या 5 तरूणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातून नागपूर जिल्ह्यातील गाडेघाटमध्ये १३ युवक दर्शनासाठी आले होते. यापैकी पाच युवकांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी सकाळी ही घटना घडली आहे. कन्हान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून युवकांचा शोध घेणं सुरू केलं आहे. मात्र अजून एकाही तरूणाचा मृतदेह सापडलेला नाही.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय सय्यद अरबाज ऊर्फ लकी, 20 वर्षीय अयाज बेग हफीज बेग, 18 वर्षीय अल्फाज, 21 वर्षीय इकबाल शेख आणि 17 वर्षीय ख्वाजा बेग तबुस्सर बेग अशी मृतांची नावं आहेत. कन्हानपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या घाडेघाट येथील अम्माचा दर्गा धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.


एक सप्टेंबरपासून ताजुद्दीन बाबा यांचा शंभरावा ऊर्स सुरू झालेला आहे. उर्सला उपस्थित राहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. या ऊर्सला उपस्थित राहण्यासाठी 13 युवक यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातून नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे आले होते. ताजबागच्या उर्समध्ये सहभागी झाल्यानंतर घाडेघाटच्या अम्माचा दर्गामध्ये गेले होते.


यावेळी समोरून वाहत असलेल्या कन्हान नदीच्या पात्रात काही युवक अंघोळ करण्यासाठी गेले. तर काही युवक गाडीमध्ये आराम करीत होते. आंघोळ करीत असताना एक युवक पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी एका मागोमाग चार युवक गेले. मात्र, तेही वाहून गेले. 


तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी या घटनेची माहिती कन्हान पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गोताखोऱ्याच्या मदतीने युवकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.