दुप्पट पैसे मिळवण्याच्या नादात सोलापुरकरांना 500 कोटींचा गंडा; ॲपच्या माध्यमातून हजारोंची फसवणूक
अचानकपणे पैसे येणे बंद झाल्याने अनेकांना धक्का बसलाय
अहमद शेख, झी मीडिया, सोलापूर : पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाखाली अनेकांना गंडा (fraud) घालण्यात आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र कोणतीही चौकशी न करता अद्यापही काही लोक दुप्पट पैसे मिळवण्याच्या नादात अशा फसवणुकीला बळी पडत आहे. असाच काहीसा प्रकार सोलापुरात पाहायला मिळाला. दुप्पट पैसे मिळवण्याच्या योडनेला बळी पडून हजारो सोलापूरकरांनी (solapur) ''सीसीएच'' (CCH) (क्लाऊड मायनर अॅप) या अमेरिकन अॅपमध्ये (App) कोट्यवधीची गुंतवणूक केली होती. चार दिवसांपूर्वी या अॅपमधून पैसे येणे अचानकपणे बंद झाल्याने गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे.
या अॅपच्या माध्यमातून गुंतवणूकदारांचे सुमारे पाचशे कोटी रुपये बुडाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गुंतवणूक केलेल्या हजारो सोलापूरकरांना यामुळे धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, यामध्ये वकील, पोलीस, डॉक्टर, टेक्स्टाईल कारखानदार, सराफ व्यावसायिक, शिक्षक तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिक देखील आहेत. अनेकांनी ''व्हर्च्यूअल मनी''मध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले होते.
गेल्या दोन दिवसांपासून फेसबुक तसेच व्हॉट्सअॅपच्या स्टेट्सवर लाखो रुपये बुडाल्याचे दुःख अनेकांनी मांडले. सोमवारी दिवसभर एकमेकांना फोनाफोनी करून कोणाचे किती गेले याची माहिती घेताना दिसले. यामध्ये कर्ज काढून पैसे गुंतवणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. सुरुवातीला ज्यांनी या अॅपमध्ये पैसे लावले त्यांना थोडेबहुत पैसे मिळाले. मात्र जसे जसे गुंतवणूकदार वाढत गेले पैसे येणे बंद झाले आणि शेवटी आपले पैसे बुडाल्याचं गुंतवणूकदरांच्या लक्षात आलं आहे.
या कंपनीने अॅपच्या माध्यमातून 2 लाख 30 हजार रुपये गुंतवल्यास सात दिवसांत 44 लाख रुपये मिळवा, अशी योजना जाहीर झाली केली होती. या योजनेला आता शेकडो सोलापूरकर बळी पडलेयत.
या अॅपचे वेड इतके वाढले की शेकडोवरून लाखो सोलापूरकरांनी अॅपवर विश्वास ठेवून साठवलेला पैसा लावला होता. अचानक विड्रॉअल बंद झाल्याने पैसा अडकून पडला आहे. विड्रॉअल पुन्हा पूर्ववत होईल का याची आशा अनेकांना नाही. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीचा विशाल फाटे स्कॅम ताजा असतानाच आता या अनोख्या स्कॅमला देखील सोलापूरकर बळी पडले आहेत.