नागपूर :  नागपूर महानगरपालिकानं पाच हजार बेडचे नियोजन असलेले सर्व सोयी असलेलं कोव्हिड केअर सेंटर उभारलं आहे. अशा प्रकारचे इतक्या मोठ्या क्षमतेचे आणि एवढ्या कमी कालावधीत तयार होणारे हे पहिलेचं ‘कोव्हिड केअर सेंटर’ असल्याचा दावा महापालिकेनं केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना विषाणूच्या दृष्टीने पुढील काही दिवस महत्त्वाचे आहेत.  नागपुरातील स्थिती सध्या नियंत्रणात असली, तरी उद्भवणाऱ्या कुठल्याही परिस्थितीशी  दोन हात करता येण्याच्या दृष्टीनं नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे सूक्ष्मनियोजन करून  त्यादृष्टीने तयारी करत आहे. त्याकरता  कळमेश्वर मार्गावरील येरला येथील राधास्वामी सत्संग न्यास या संस्थेच्या सहकार्याने  त्यांच्या आश्रमाच्या परिसरात  हे  पाच हजार बेडचे नियोजन असलेले सर्व सोयींनी युक्त ‘कोव्हिड केअर सेंटर’ उभारण्यात आलं आहे.   


भविष्यात कोविड रुग्ण संख्येत वाढ झाल्यास त्यांची योग्य सोय व्हावी, त्यांच्यावर तेथेच उपचार करता यावे, यादृष्टीने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘कोव्हिड केअर सेंटर’ची संकल्पना मांडली. त्यांच्या या संकल्पनेला राधास्वामी  सत्संग न्यासने सहकार्य करीत उपचार कालावधीसाठी जागा उपलब्ध करून दिली.


राधास्वामी सत्संग न्यासाने केवळ जागाच उपलब्ध करून दिली नाही  तर या सेंटरसाठी आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. मॅटीन, बॅरिकेटींग, कम्पार्टमेंट, साईडिंग, डोम या सर्व व्यवस्था संस्थेने उपलब्ध करून दिल्या. इतकेच नव्हे तर शुद्ध पिण्याचे पाणी आणि रुग्णांकरिता सात्विक भोजन  ही सुद्धा व्यवस्था संस्थेने केली आहे.


कोव्हिड केअर सेंटरसाठी डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी, बेड, चादर, उशी, भोजनासाठी ट्रे व अन्य काही व्यवस्था नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. एकूणच केंद्र शासन आणि राज्य सरकारने ‘कोविड केअर सेंटर’ बाबत ठरवून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करूनच हे ‘कोव्हिड केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे.  


 



या कोव्हिड केअर सेंटरमध्ये सद्यस्थितीत 500  बेड तयार करण्यात आले असून गरजेनुसार ते पुढे वाढविण्यात येणार आहे.  येथे प्रत्येक 100 बेडच्या मागे 20 डॉक्टर, वैद्यकीय चमू आणि इतर कर्मचा-यांची टीम कार्यरत असणार आहे.