Ganeshotsav 2023:  गणेशोत्सवाच्या काळात कायदा तसेच सुव्यवस्था राखण्यासाठी पुण्यामध्ये सुमारे 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त तर 1 हजार 800 सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. उत्सवाच्या कालावधीत शहर,  तसेच उपनगरात मोठ्या संख्येनं पोलीस तैनात असणार आहेत. पुण्याचे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ही माहिती दिली.


पुण्यात  दहशतवादी हल्ल्याची शक्यता?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना काही महिन्यांपूर्वी पुणे पाेलिसांनी कोथरुड परिसरातून अटक केली. त्यातूनच इसीस च्या महाराष्ट्र मॉड्युल चा पर्दाफाश झाला. दहशतवादी हल्ल्याची शक्यता, घातपाती कारवायांची शक्यता, किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाची गुन्हेगारी, वाहतूक नियोजन या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन पोलिसांकडून उत्सवाच्या काळात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अनुचित प्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस फिल्डवर असणार आहेत.


गर्दीच्या ठिकाणाची दिवसभरात चार वेळा तपासणी


पोलीस आयुक्तालयातील पाच हजार पोलीस कर्मचारी, अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, बाहेरगावाहून मागविण्यात आलेले एक हजार 300 पोलीस कर्मचारी, एक हजार गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय सुरक्षा दलाच्या पाच तुकड्या बंदोबस्तात राहणार, बंदोबस्तास पोलीस मित्र सहाय्य करणार उत्सवी गर्दीवर शहरात 1 हजार 800 सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवणार आहेत.  उत्सवाच्या कालावधीत मानाच्या मंडळासह गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून तपासणी केली जाणार आहे.  पथकातील प्रशिक्षित श्वान, पोलीस कर्मचारी गर्दीच्या ठिकाणाची दिवसभरातून चार वेळा तपासणी करणार आहेत. 


कोकणात जाणाऱ्यां नागरिकांसाठी पुण्यातून तीन विशेष ट्रेन 


गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यां नागरिकांसाठी पुण्यातून तीन विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत. 22 आणि 29 सप्टेंबरला पुणे ते कोकण आणि 24 सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला कोकणातून पुण्याकडे ह्या रेल्वे सोडण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे.


मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या लांबचलांब रांगा 


गणपतीसाठी चाकरमानी गावाकडे निघाल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची तुफान कोंडी पाहायला मिळाली. वाकण ते नागोठणेपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. तर इंदापूरजवळही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोकणात जाणा-या आणि येणा-या लेनवर वाहतूक तासंतास ठप्प होती. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काही वाहनं कोलाड येथून महाड कडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिकडे रत्नागिरीतही मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. संगमेश्वर बाजारपेठ ते शास्त्रीपूल वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर तिसरीकडे मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरही उर्से टोल नाक्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा पहायला मिळाल्या.  मुंबईकर गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावी निघालेले आहेत. परिणामी एक्सप्रेस हायवेवर ताण देखील वाढलाय.