नितीन पाटणकर, पुणे : सोनसाखळी चोरांनी पुण्यात धुमाकूळ घातला आहे. अवघ्या दीड तासात सोनसाखळी चोरीच्या सहा घटना घडल्या आहेत. ज्यावेळी पोलिसांची गस्त नसते अशीच वेळ चोरट्यांनी साधल्याचं दिसतं आहे. पुणेकरांनो सकाळी बाहेर पडताना तुमच्या गळ्यातले दागिन्याकडे लक्ष ठेवा. कारण रस्त्यात चालताना तुमच्या गळ्यातले दागिने हिसकावले जाण्याची दाट शक्यता आहे. एकट्या पुण्यात अवघ्या दीड तासात सोनसाखळी चोरीच्या सहा घटना घडल्या आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी साडेसात वाजता वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिली सोनसाखळी चोरीची घटना घडली. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ वाजून ४५ मिनिटांनी दुसरी सोनसाखळी चोरी झाली. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ वाजून १० मिनिटांनी तिसरी सोनसाखळी चोरी झाली. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ वाजून २० मिनिटांनी चौथी सोनसाखळी खेचण्यात आली. बिबवेवाडीत ८ वाजून ३० मिनिटांनी पाचवी सोनसाखळी चोरी झाली तर फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ वाजून ४५ मिनिटांनी सहावी चोरी झाली. सदाशीव पेठेतल्या कौमुदिनी ठोंबरे याच चोरट्यानं मंगळसूत्र लांबवलं.


सकाळच्या वेळेस वर्दळ कमी असल्यानं चोरट्यांनी डाव साधल्याचं पोलीस सांगत आहेत. पोलिसांनी आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या रात्रपाळी आणि दिवसपाळीच्या कर्मचाऱ्यांची ज्यावेळी आदलाबदली होते नेमक्या त्याचवेळी चोरट्यांनी डाव साधला. सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी नवी रणनिती आखणं गरजेचं आहे. नाहीतर पुणेकरांना सकाळी घराबाहेर पडणंही कठीण होऊन जाईल.