सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : राज्यभरात सध्या मोठ्या प्रमाणावर गोवरच्या रुग्णांची (measles disease) सातत्याने वाढ होत आहे. राज्यभरात साडेसहा हजार गोवरचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यातील 503 रुग्णांना गोवरची लागण झाल्याची स्पष्ट झाले आहे. मुंबई (Measles outbreak in Mumbai), भिवंडी आणि मालेगाव येथे मोठ्या प्रमाणत गोवरचे रुग्ण आढळून आले आहे. मुंबईत शुक्रवारी गोवरच्या संशयित रुग्णसंख्या 2 हजार 860 झाली असून 173 रुग्णांना गोवरची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आणखी एका बाळाचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या नऊ झाली आहे. त्यामुळे राज्यभरात कोविडसारखाच गोवरचा संसर्ग होत आहे का अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आतापर्यंत आढळून आलेल्या बहुतांश रुग्णांचे लसीकरण पूर्ण न झाल्याचे दिसून आले आहे. राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे (Dr pradeep awate) यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिलीय.


गोवरची लक्षणे कोणती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य असा आजार असून लसीकरणामुळे तो टाळता येतो. हा आजार पाच वर्षांखालील मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, सुरुवातीला चेहऱ्यावर आणि नंतर उर्वरित शरीरावर लाल, सपाट पुरळ ही आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. गोवरमुळे काही मुलांमध्ये अतिसार, मध्य कर्ण संसर्ग, न्यूमोनिया, क्वचित फेफरे, अंधत्व किंवा मेंदू संसर्ग अशी गुंतागुंत होऊ शकते. लसीकरणामुळे गोवर, रुबेला सारखे आजार टाळता येत आहे.


60 टक्क्यांहून अधिक रुग्णांचे लसीकरण नाही


भारत सरकारने गोवर आणि रुबेला हे दोन्ही आजार हद्दपार करण्याचं ठरवलं आहे. हे उद्दिष्ट अगदी जवळ आलेलं असताना राज्यात गोवरची रुग्ण संख्या वाढत आहे. फक्त राज्यात नव्हे तर भारतातही याचा उद्रेक होत असून ते आत्ता 5 पटीने वाढत आहे. राज्यात आतापर्यंत जेवढे रुग्ण आढळून आलेले आहे त्यामध्ये 60 टक्क्यांहून अधिक रुग्णांचे लसीकरण झाले नसल्याची माहिती प्रदीप आवटे यांनी दिलीय.


"गोवर हा लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. प्रत्येक बालकाला 10 ते 12 महिने आणि 16 ते 24 महिने या कालावधीत गोवरचा पहिला आणि दुसरा डोस देतो. यानंतर त्या बाळाला गोवर होण्याची शक्यता नसते. देशात आणि राज्यात सध्या गोवरचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नऊ महिने ते पाच वर्षे या वयोगटातील जी मुले गोवर लसीकरणापासून वंचित राहिली आहेत त्यांना लस देणे महत्त्वाचे आहे," असे प्रदीप आवटे म्हणाले.


दरम्यान, गोवरपासून बचाव करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून लसीकरणाची सत्रे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये 745 लसीकरणाची सत्रे घेण्यात आली आहेत. यामध्ये 7 हजार 660 बाळांना एमआर 1 आणि 6 हजार 302 बालकांना एमएमआर लस देण्यात आली आहे.