आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर :  जिल्ह्यातील वरोरा पोलीस ठाण्यातील मालखान्यात असलेल्या जप्तीतील दारुसाठ्यापैकी ६६ लाख १३ हजार ५५० रुपयाच्या देशी-विदेशी दारू साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाच्या परवानगीवरून पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुलडोजर चालवून तो नष्ट करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना येथे मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारु तस्करी आणि विक्री होत आहे. यावर पोलिसांची देखील नजर असते. परिणामी प्रत्येक महिन्यात ६० पेक्षा अधिक गुन्हे दारू तस्करावर येथे दाखल होत आहे. त्यामुळे जप्तीतील दारूसाठा साठवून ठेवण्यात अडचण निर्माण होत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस ठाण्यातील मालखान्यात जागा नसल्याने ठाण्यातील काही वाहनातच दारूसाठा ठेवण्यात आला होता. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी वरोरा पोलीस स्टेशन च्या पोलीस निरीक्षकांनी जप्तीतील दारूसाठा नष्ट करण्याची परवानगी न्यायालयाला मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने एकूण १९३ गुन्ह्यातील दारूसाठा नष्ट करण्याची परवानगी दिली होती. 



उत्पादन शुल्क विभागाला याची सूचना देत त्यांच्या उपस्थितीत डिसेंबर २०१७ ते एप्रिल २०१८ अशा केवळ पाच महिन्यातील १९३ गुन्ह्यात जप्त ४७४ पेटी देशी, १०३ पेटी विदेशी दारू आणि २६ नग बियर कॅन असे ६६ लाख १३ हजार ५५० रुपयाचा दारूसाठा पोलीस स्टेशनच्या आवारात बुलडोजर चालवून नष्ट करण्यात आला. त्यासोबतच फुटलेल्या बॉटल मोठ्या खड्डा खोदून पुरण्यात आल्या .