नागपुरात कोरोनाचे सात नवीन रुग्ण, बाधितांची संख्या ८८ वर
नव्याने नागपुरात सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
नागपूर : नागपुरातील रुग्णाची कोरोना संदर्भातली लपवाछपवी महागात पडली आहे. मृत कोरोना बाधिताकडून सुमारे ४१ जणांना कोरोना लागण झाली आहे. आता नव्याने नागपुरात सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या ८८ वर पोहोचली आहे. आज सापडलेले पॉझिटिव्ह रुग्ण आधीच क्वारंटाईन करण्यात आले होते. चार जण रवी भवन येथे तर तीन जण वनामतीमध्ये होते क्वारंटाईन करण्यात आले होते.
मास्क न लावणाऱ्यांना बेडूक उड्यांची शिक्षा
दरम्यान, मास्क न लावता सकाळी सकाळी बाहेर फिरणाऱ्या तीन तरुणांना नागपूर पोलिसांनी चांगलीच अद्दल घडविली आहे. नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत बस स्टॅन्ड जवळ हे तिन्ही तरुण सकाळी फिरण्यासाठी बाहेर निघाले होते. या तिघांनीही मास्क घातले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना जमिनीवर बेडूक उड्या मारण्याच्या शिक्षा केली. पोलिसांनी दिलेल्या या शिक्षेमुळे निर्मनुष्य रस्त्यावर हे तिघे तरुण बराच अंतर बेडूक उड्या मारत गेले. तसेच त्यांना बेडूक उड्या मारल्यानंतर दंड बैठक मारायला ही लावल्या. त्यानंतर मास्क लावल्याशिवाय तर बाहेर निघणारच नाही, असे आश्वासन पोलिसांना दिल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.
पोलिसांचे आवाहन
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊन दरम्यान पोलीस २४ तास ऑन ड्युटी आहेत. कोरोनाविरुद्धचा लढा जिंकण्यासाठी घरीच थांबा , बाहेर विनाकारण फिरु नका अशी विनंती, आवाहन करत, तर कधी कठोरपणे दुंडक्यांचा प्रसाद देत पोलीस लोकांना समजवून सांगत आहेत. मात्र याचबोरबर लोकांच्या मदतीला धावून जात आहेत. लोकांच्या समस्या तसेच त्यांना आनंद देता येईल यासाठीही पोलीस सतत प्रयत्नरत आहेत. याबाबतच एक चित्र नागपुरात पाहायला मिळत आहे.
पोलिसांनी दिला सुखद धक्का
नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये पोलिसांना रोहित इंगोले या तरुणाचा फोन आला. माझा वाढदिवस आहे, केक घ्यायला घराबाहेर पडता येईल का, अशी विचारणा त्याने केली. पोलिसांनी नकार दिला. मात्र, निराश होऊ नये म्हणून चक्क पोलीस केक घेऊन चक्क त्याच्या घरी गेले आणि त्याला सरप्राईज दिले. पोलिसांच्या या सरप्राईजमुळे रोहितला सुखद धक्का बसला.