Doctor Strike : राज्यातील आरोग्यसेवा कोलमडणार? कोरोना संकटात डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णांचे हाल
Mard Strike : आजपासून संपावर जाण्याचा इशारा निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने इशारा दिला होता. त्यानंतर आता राज्यभरात निवासी डॉक्टरांनी संप सुरु केला आहे. मात्र यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे
Doctor Strike : मार्डच्या (Mard Strike) इशाऱ्यानंतर राज्यभरातील सात हजार निवासी डॉक्टर (Resident Doctors) संपावर गेले आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी या डॉक्टरांनी संप पुकारला आहे. आजपासून सुरु झालेल्या या संपामध्ये अतिदक्षता विभाग (ICU) वगळता अन्य सर्व विभागांमधील सेवा बंद ठेवण्याचा इशारा मार्डने दिला आहे. या संपामुळे काही रुग्णालयांतील लहान शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे प्रशासनानेही या संपाच्या पार्श्वभूमीवर तयारी केली आहे. रुग्णांना फटका बसू नये यासाठी मुंबईतील केईएम, नायर, शीव, कूपर आणि जे.जे. रुग्णालयामध्ये आवश्यकतेनुसार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सर्व रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभाग सुरु ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ऐन कोरोना संकटातच राज्यातील डॉक्टर संपावर गेल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. मुंबईतही या संपाचे पडसाद उमटत आहेत. प्रशासनाच्या जे. जे. रुग्णालय तर महापालिकेच्या केईएम, सायन, नायर, कूपर रूग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आज पासून कामबंद आंदोलन सुरू केलंय. या रूग्णालयांमधील सर्व सेवा सुरू असल्या तरी ओपीडीवर मात्र परिणाम जाणवू लागलाय. मात्र दुसरीकडे अत्यावश्यक सेवांमधील निवासी डॉक्टरांची सेवा सुरू असल्यानं तिथल्या रूग्णसेवेवर परिणाम जाणवणार नाहीय. नायर रूग्णालयासमोर निवासी डॉक्टरांनी एकत्र येत आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
डॉक्टरांच्या मागण्या कोणत्या?
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नवीन वसतीगृह बांधून द्या, एक वर्षाच्या शासकीय बाँड बद्दलच्या अटीचा पुनर्विचार करा, वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयात शिक्षकांची भरती करा, निवासी डॉक्टर्सना सातव्या वेतन आयोगाच्या दर्जानुसार विद्या वेतन द्या, अशा अनेक मागण्या घेऊन निवासी डॉक्टर्स बेमुदत संपावर गेले आहेत.
दरम्यान, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्याल आणि रुग्णालयात 585 निवासी डॉक्टर्स संपावर गेल्याने रुग्णसेवा बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवार सकाळपासूनच सर्व निवासी डॉक्टर्स रुग्णालयाच्या आत गेले नसून आकस्मिक वैद्यकीय सेवा विभागाच्या समोर घोषणाबाजी करत आंदोलन करत आहेत. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 350 निवासी डॉक्टर्स ही संपात उतरले आहे. त्यामुळे नागपुरातील दोन्ही शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रुग्णसेवा बाधित झाली आहे. जोपर्यंत शासन आमच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करत नाही तोवर फक्त आकस्मिक सेवा सोडून इतर कुठलीही रुग्णसेवा आम्ही देणार नाही असा निर्धार आंदोलन करणाऱ्या डॉक्टर्सांनी दिला आहे.