शशिकांत पाटील, लातूर : 2021 या नव्या वर्षाचं नवं कॅलेंडर कदाचित तुम्ही घेतलं असेल. नसेल घेतलं तर लवकरच तुम्ही कॅलेंडर घरी आणालच. पण त्याआधी ही बातमी पाहा... लातूरच्या कॅलेंडरवाल्या आजोबांची.. त्यांच्या धडपडीची...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सडपातळ बांधा, डोळ्यावर काळा चष्मा, डोक्यावर पांढरी टोपी, खांद्याला शबनम झोळी... आणि झोळीत गुंडाळलेली कॅलेंडर... हे आहेत चंद्रकांत देविदास नाईक... मूळचे लातूरचे असलेले हे 75 वर्षांचे आजोबा औसा शहरात कॅलेंडर विकत फिरतात... त्यांच्या घरची परिस्थिती फारच हलाखीची आहे.. सूनेच्या मृत्यूनंतर एकुलत्या एका मुलाला जबर मानसिक धक्का बसलाय... त्यामुळं कुटुंबाची जबाबदारी चंद्रकांत बाबांवर पडली आहे. त्यांचा नातू आदित्य यंदा दहावीत शिकतोय. नातवाचा शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी उतारवयात त्यांना अशी कॅलेंडर विक्री करावी लागतेय.


एक कॅलेंडर विकलं तर ०५, ०६, ०७ रुपये येतात. ०२ हजार कॅलेंडर विकले तर महिन्याकाठी १० हजार रुपये मिळतात इतके पैसे कोण देणार. इकडून तिकडून हात पैसे पसरण्यापेक्षा हे बरं आहे. टक्केवारीने पैसे घेण्याची पाळी येत नाही. स्वयंपाक मुलगा करतो. माझी मंडळी गेल्यावर्षी वारली. मुलगा काम करत नसल्याच्या त्रासाला कंटाळून. मुलगा घर विकायचं म्हणतो. पैसे बँकेत टाकून व्याजावर जगायचं म्हणतो. प्रत्येक अवयवाला काम पाहिजे.


कॅलेंडर विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळं कुणापुढं हात पसरण्याची वेळ येत नाही, असं नाईकबाबा सांगतात.. नातवानं शिकून मोठं व्हावं, एवढंच त्यांचं स्वप्न आहे...


नाईक 'बाबां'च्या या जिद्दीची आणि चिकाटीची कहाणी औसा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेक जण आवर्जून त्यांच्याकडून कॅलेंडर विकत घेतात. नातवासाठी धडपडणाऱ्या या आजोबांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. असे आजोबा असतील तर प्रत्येक नातू अजिंक्य ठरल्याशिवाय राहणार नाही.