सातवा वेतन आयोग : नव्या वर्षाच्या अगोदरच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाची खुशखबर
आज मंत्रिमंडळ बैठकीत सातव्या वेतन आयोगावर शिक्कामोर्तब होणार
मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांना शासनानं नवी वर्ष सुरू होण्याअगोदरच खुशखबर दिलीय. राज्यात सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या निर्णयावर आज मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलंय. सातवा वेतन आयोगाबाबत नेमलेल्या बक्षी समितीचा अहवाल नुकताच राज्य शासनाकडं सादर झाला होता. १७ लाखांपेक्षा अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना आणि सुमारे ७ लाख पेन्शनधारकांना याचा लाभ होणार आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि भत्त्यात भरघोस वाढ होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात जवळपास २३ टक्क्यांनी वाढ होणार आहे... तर राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी सुमारे २१ हजार ५३० कोटी रूपयांचा आर्थिक भार पडणार आहे.
याआधी दिवाळीतच महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतनाचं गिफ्ट मिळेल, असं महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी म्हटलं होतं... परंतु, दिवाळीत नाही झालं तरी नव्या वर्षाच्या सुरुवातीला का होईना पण सातवा वेतन आयोग लागू झालाय, त्यामुळे कर्मचाऱ्यांनीही आनंद व्यक्त केलाय.