मुंबई : राज्यभरात मान्सून पूर्व पावसानं शनिवारी जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा, वीजांचा कडकडाट आणि जोरादार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला तर दुसरीकडे राज्यभरात आठ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत.


झाड कोसळुन चौघींचा मृत्यू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळे शहरालगत असलेल्या वरखेडी बाळापुर शिवारात शेतात पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या पावरा कुटूंबातील तीन लेकी आणि त्याच्या आईवर काळाने घाला घातला. वादळी वाऱ्यासह सलग चार तास सततधार सुरु असलेल्या पाऊसाने या कुटूंबाचा घात केला. ज्या पत्र्याच्या शेडमध्ये पावरा कुटूंब राहत होत त्या शेडवर वादळामुळे झाड कोसळले. त्यात दबून आईसह तिघा लेकींचा जीव गेला.


वीज कोसळून तिघांचा मृत्यू


सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने मुंबई उपनगर आणि ठाणे पट्ट्यातही पाऊस बरसला. मुंबईतल्या भांडुपच्या खिंडीपाडा परिसरात विजेचा शॉक लागून तीन जणांचा मृत्यू झालाय. ९ वर्षांची मुलीसह एका व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे. पावसामुळे जमीन ओली झाली होती. त्यामुळे शॉक लागून ही दुर्घटना घडली. त्यावेळी तिला वाचविण्यासाठी गेलेल्या अनिल यादव या तरुणाला देखील विजेचा शॉक लागून आपला जीव गमवावा लागला.


तर कांजूरमार्ग पूर्वेकडील शिवकृपानगर परिसरात ओमअप्पा फडतरे या दहा वर्षीय मुलाचा विजेच्या तारांच्या संपर्कात येऊन जागीच मृत्यू झाला. तर रोहन सुतार हा बारा वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला असुन त्याचावर उपचार सुरु आहेत. 


वीज कोसळून तरुणाचा मृत्यू


रत्नागिरीतही मान्सून पूर्व पावसाने पहिला बळी घेतलाय. अंगावर वीज पडून हातखंबा तारवेवाडी इथं २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. पंकज घवाळी अस मृत तरुणाचं नाव आहे. दुपारच्या सुमारास वाड्याच्या बाहेर उभा असणाऱ्या पंकज घवाळीच्या अंगावर वीज कोसळली तसेच आजूबाजूच्या घरातील वायरिंग देखील जळून खाक झालीय.