ठाण्यात गुडविन ज्वेलर्सविरोधात ८० लोकांच्या तक्रारी, दीड कोटींची फसवणूक
ठाणे येथील गुडविन ज्वेलर्सच्या विरोधात आज ७० ते ८० लोकांनी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
ठाणे : येथील गुडविन ज्वेलर्सच्या विरोधात आज ७० ते ८० लोकांनी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ठाण्यातील गडकरी सर्कल येथे असलेल्या गुडवीन ज्वेलर्सने गुंतवणूकदारांना १८ ते २० टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून मोठी रक्कम घेतली. दरम्यान, ठाण्यात सुरु करण्यात आलेले शॉप बंद करून मालक सुनील नायर आणि सुदेश नायर पसार झालेत. पोलिसांनी या दोघांविरोधार कलम ४०६ आणि ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाण्यातील गुंतवणूकदारांची एकूण दीड कोटी रुपयांपर्यंत फसवणूक झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वक्त करण्यात आला आहे.
पीएमसी बँक गैरव्यवहारानंतर आता गुडवीन ज्वेलर्सच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. मोठे व्याज दाराचे आमिष दाखवून तसेच पाच वर्षांत दुप्पट रक्कम देण्याचे सांगून गुडविन ज्वेलर्सच्या माध्यमातून फसवणूक झाली आहे. जास्तीचे पैसे मिळणार म्हणून काहींनी निवृत्तीचे पैसे तर कोणी आयुष्यभराची कमावलेली रक्कम या ठिकाणी गुंतवली आहे. मात्र मुदत संपूनही त्यांचे व्याज आणि मूळ रक्कम मिळत नसल्याने काही जण याची मागणी करण्यास गेले. त्यावेळी दुकानाचे मालक पसार झाल्याचे पुढे आले. त्यामुळे आता काय करायचे, असा प्रश्न गुंतवणूकदरांना पडला आहे, त्यांच्या पाया खालची जमीनच सरकली आहे.
नौपाडा पोलीस ठाण्यात ८० लोकांनी गुडविन ज्वेलर्सविरोधात तक्रार दाखल केली आहेृ. पोलिसांनी देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मोठया व्याजाला बळी पडून अशाप्रकारची गुंतवणूक करू नये, असे आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे. या दोन्ही भावांचा शोध सुरू करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली आहे.