8000 Crore Approved By Modi Cabinet: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वरील नाशिक फाटा ते खेड म्हणजेच राजगुरुनगरदरम्यानच्या एका प्रकल्पासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या दोन्ही ठिकाणांना जोडणारा 30 किलोमीटरचा उन्नत मार्ग म्हणजेच एलिव्हेटेड कॉरिडोअर उभरण्यास केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारने हिरवा कंदील दिला असून त्यासाठी तब्बल 8 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा तत्वावर आठ पदरी उड्डाणपुलाच्या निर्मितीला परवानगी देण्यात आली आहे. हा नवीन मार्ग मंजूर करुन घेण्यामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी महत्त्वाची भूमिका बजावली. या मार्गामुळे पुणे आणि खेडदरम्यान होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. 


गडकरी कनेक्शन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये रस्त्यांबरोबर इतर महतत्वाच्या मूलभूत सुविधांसंदर्भातील बांधकाम प्रकल्पांना मंजुरी देत निधी जाहीर करण्यात आला. नाशिक फाटा ते खेडदरम्यानच्या मार्गावर उन्नत मार्ग उभारल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल अशी गडकरींचं म्हणणं होतं आणि त्यानुसार त्यांनीच पहिल्यांदा या मार्गाची कल्पना मांडली होती. विशेष म्हणजे नाशिक फाटा ते खेडदरम्यानच्या एलिव्हेटेड मार्गासाठीचं भूसंपादनासंदर्भातील हलचाली सुरु झाल्या असून प्रत्यक्ष काम ऑक्टोबरपासून सुरु होईल अशी माहिती आहे.


कंपन्यांना मोठा दिलासा


सध्य स्थितीमध्ये नाशिक फाटा ते खेडदरम्यान प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते. चाकणमध्ये मोठ्याप्रमाणात औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे येथे असणाऱ्या लहान-मोठ्या कंपन्यांना या वाहतूक कोंडीचा मोठ्याप्रमाणात फटका बसतो. त्यामुळे हा 30 किलोमीटरचा एलिव्हेटेड मार्ग या कंपन्यांसाठी नक्कीच फयद्याचा ठरणार आहे. या नव्या प्रकल्पामुळे पुणे ते नाशिकदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. 


खर्च किती? नेमकं करणार काय?


या प्रकल्पासाठी एकूण 7 हजार 827 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र मोदी सरकारने या प्रकल्पासाठी वाढीव खर्च लक्षात घेत 8 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. या प्रकल्पाअंतर्गत नाशिक फाटा ते खेडदरम्यान 8 पदरी माहामार्ग बांधला जाईल. सध्याचा चार पदरी रस्ता सहा पदरी केला जाईल. दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड असेल. 



विकासाला गती मिळेल असा विश्वास


या मार्गामुळे पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवड, चाकण आणि खेडमधील विकासाला गती मिळेल असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे. पुणे-नाशिक प्रवास अधिक सुखकर होण्याबरोबरच ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकणमधील लॉजिस्टिक्सची क्षमता वाढेल. वाहतूक खर्चही कमी होईल असं केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी म्हटलं आहे.