मुंबई : महाराष्ट्रात सतत कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. यामध्ये पोलिसांची संख्या देखील मोठी आहे. गेल्या २४ तासात राज्यात ८७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या १,७५८वर पोहोचली आहे. यांपैकी ६७३ पोलीस या आजारातून बरे झाले आहेत. तर १८ पोलिसांचा आजवर मृत्यू झाला आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे. दरम्यान कोरोनाविरूद्ध युद्ध लढणाऱ्या कोरोना वीरांना या धोकादायक विषाणूची लागण होत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलीस दलात आत्तापर्यंत ११ पोलिसांचे करोनाची बाधा होऊन मृत्यू झाले आहेत. तर उर्वरित विविध जिल्ह्यांमध्ये सात पोलिसांचे करोनामुळं मृत्यू झाले आहेत.  यामध्ये  पुणे आणि सोलापूरमध्ये  प्रत्येकी दोन तर ठाण्यात एका महिला कॉन्स्टेबलचा करोनामुळं बळी गेला आहे.



तर, आजच्या दिवशी राज्यात ३३ हजार ६८६ कोरोनाचे रुग्ण आहेत. १३ हजार ४०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण ३ लाख ४८ हजार २६ टेस्ट झाल्या. दुर्देवाने १५७७ मृत्यू झाले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिली. 


त्याचप्रमाणे, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता पर्यंत देशात १ लाख ३१ हजार ८६८ लोकांना कोरोनाची लागण झाली  आहे. त्यापैकी ३ हजार ८६७ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे  ५४ हजार ४४० रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडले असून ७३ हजार ५६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत