वर्षभरात ९० भाविक बेपत्ता... शिर्डी मानवी तस्करीचं केंद्र?
साईबाबांच्या शिर्डीत मानवी तस्करी किंवा मानवी अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत
शिर्डी : आत्तापर्यंत साईबाबांचं वास्तव्याचं ठिकाण म्हणून ओळखली जाणारी शिर्डी आता मात्र एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलीय. इथं जाणारे भाविक गायब होतात कुठे? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय. त्याचं कारण म्हणजे गेल्या वर्षभरात तब्बल ९० भाविक शिर्डीमधून बेपत्ता झालेत. या प्रकरणी हायकोर्टात दाद मागण्यात आलीय. न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांच्या खंडपीठाने प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. खंडपीठाने भाविकांमधून महिला, मुले आणि पुरुष बेपत्ता होण्याचे प्रमाण भयावह असल्याची चिंता व्यक्त केली.
यामध्ये मानवी तस्करी किंवा मानवी अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत काय? यासंदर्भात आणि बेपत्ता व्यक्तींच्या तपासासाठी विशेष पथक नेमून तपास आणि आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश सुनावणीअंती नगरच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. याचिकेवर पुढील सुनावणी १० जानेवारी २०२० ला होणार आहे.