मराठी साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस, लेखक, कवींचा बहिष्कार
यवतमाळमध्ये सुरु झालेल्या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस आहे.
यवतमाळ : यवतमाळमध्ये सुरु झालेल्या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस आहे. मात्र दुसऱ्या दिवशी नियोजित आमंत्रित आणि लेखक कवींनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे संमेलनाची कार्यक्रमपत्रिका संयोजकांना बदलावी लागत आहे. परिणामी ऐनवेळी आयोजकांची धावाधाव सुरू झाली आहे. तत्पूर्वी पहिल्या दिवशी अध्यक्षीय भाषणात अरुणा ढेरे यांनी नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यामुळे संयोजकांचा तिखट शब्दात समाचार घेतला. नयनतारांचं निमंत्रण रद्द करणं चुकीचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. संयोजकांनी झुंडशाहीपुढे झुकलं अशोभनीय असून संमोलनात घडलेली ही गंभीर चूक असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
काय म्हणाल्या संमेलनाध्यक्ष ?
वयाची नव्वदी पार केलेल्या नयनतारा सहगल इतक्या दूर संमेलनाला येणार होत्या. त्यांना याठिकाणी मोकळेपणाने त्यांचे विचार मांडून द्यायला पाहिजे होते. हे विचार आपल्या विवेकबुद्धीने स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे स्वातंत्र्य आपल्याला होते. मात्र आपण या सगळ्याकडे त्यादृष्टीने पाहू शकलो नाही असे अध्यक्षीय भाषणात अरुणा ढेरे यांनी सांगितले. संमेलन ही भाबड्या वाचकांना भडकावण्याची जागा नव्हे. आपण भले सामान्य असू, पण सुसंस्कृत आणि वाचणारी माणसे आहोत. त्यामुळे स्वत:च्या शक्तीवर विश्वास ठेवून असे प्रकार घडू न देणे, ही आपली जबाबदारी असल्याची आठवण अरुणा ढेरे यांनी साहित्यिक आणि वाचकांना करुन दिली.