प्रेम, लग्न आणि मृत्यू... 19 वर्षाच्या तरुणीच्या आयुष्याचा भयानक शेवट
लग्नाचा निर्णय चुकल्याने तरुणीने आपले आयुष्य संपवले आहे. प्रेमविवाह झाल्यानंतर पती आणि सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे.
Navi Mumbai Crime News : एक निर्णय चुकला की आयुष्य बर्बाद होते. नवी मुंबईत 19 वर्षाच्या तरुणीच्या आयुष्याचा भयानक शेवट झाला आहे. या तरुणीने प्रेमविवाह केला पण अवघ्या 3 महिन्यात सगळ संपल आहे. संसाराचा डाव मोडून या तरुणीने आत्महत्या केली आहे. पती आणि सासरच्या छळाला कंटाळून या तरुणीने आपले जीवन संपवले आहे. आत्महत्ये प्रकरणी तरुणीच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Navi Mumbai Crime News).
सलोनी वैभव म्हात्रे (वय 19 वर्षे) असे मृत तरुणीचे नाव आहे. उलवे परिसरातील मोरावे गाव येथे सासरच्या घरी सलोनी हिने गळफास लावून आत्महत्या केली आहे. नवी मुंबईतील एनआरआय पोलिस ठाण्यात सलोनीचे पती वैभव म्हात्रे(वय 20 वर्षे), सासू संगीता म्हात्रे आणि दीर अमोल अमोल म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलोनीने का घेतला आत्महत्या करण्याचा निर्णय?
3 महिन्यांपूर्वीच म्हणजेच मे महिन्यात सलोनी आणि वैभव यांचा प्रेमविवाह झाला होता. या दोघांच्या प्रेमसंबधांबाबत समजल्यावर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे लग्न लावून दिले होते. मात्र, कमी वयात लग्न करण्याचा निर्णय सलोनीच्या जीवावर बेतला आहे. लग्न झाल्यानंतरही वैभव याला जबाबदारीचे भान नव्हते. वैभव हा नोकरी, व्यवसाय करत नव्हता. यामुळे घरात पैशांवरुन वाद होत होते. पती वैभव तिच्यावर माहेरमधून पैसे आणण्यास भाग पाडत होता. सलोनीच्या घरच्या तिला पैसे देत होते. सासू संगीता आणि दीर अमोल देखील तिचा विविध कारणांमुळे छळ करत होते. प्रचंड त्रास होत असल्याने सलोनी नैराश्यात होती. याच तणावातून सलोनीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
सलोनीचा भाऊ पैसे घेऊन आल्यावर उघडकीस आला प्रकार
सलोनी मृत्यूबाबत तिच्या कुटुंबियांना काहीच माहिती नव्हते. सलोनीचा भाऊ पैसे घेऊन तिच्या सासरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. घरी कुणीच नव्हते. यानंतर त्याने चौकशी केली असता सलोनीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजले. सलोनीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समजातच तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. ही बाब तिच्या सासरच्या मंडळींनी लपवून ठेवल्याचा आरोप तिच्या भावाने केला. यानंतर त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठत सलोनीचा पती वैभव, सासू संगीता आणि दीर अमोल यांच्याविरोधता तक्रार दाखल केली.