Ambernath Crime News : अंबरनाथ येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काही दिवसांपूर्वी एका वृद्धाची हत्या करण्यात आली होती. मात्र, हत्येची माहिती मिळत नव्हती. दरम्यान, या वृद्धाच्या हत्येचे कारण पुढे आले नव्हते. पोलिसांनी अधिक तपास करताच धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वृद्धाची हत्या एका तरुणाने केल्याचे तपासात उघड झाले. या वृद्धाने समलैंगिक संबंधांची मागणी करताना त्याच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या तरुणाची सटकली आणि त्यांने वृद्धाचा गेम केला.


समलैंगिक संबंधांसाठी जबरदस्ती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबरनाथच्या चिखलोली पाड्यात वृद्धाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी संदीप जैस्वाल या 19 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. समलैंगिक संबंधांसाठी जबरदस्ती केल्याने कृष्णानंद मुनियान यांची हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.



रविवारी केली होती हत्या  


अंबरनाथच्या चिखलोली पाड्यात राहणारे कृष्णानंद मुनियान यांची रविवारी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी शेजाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात तरुणाच्या विरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुनियान यांच्या हत्येनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन तीन ते चार संशयित आरोपींना ताब्यात घेतलं होते. त्यांची चौकशी केल्यानंतर आरोपी संदीप जैस्वालनं हत्या केल्याची कबुली दिलीय. 


दारु पिण्याच्या बहाण्याने रुमवर झोपायला बोलावलं


रविवारी रात्री कृष्णानंद मुनियान यांनी आरोपी संदीपला दारु पिण्याच्या बहाण्यानं रुमवर झोपायला बोलावलं होते. त्यानंतर वृद्ध कृष्णानंद मुनियान यांनी आरोपी संदीप सोबत समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. हाच राग मनात ठेवत संदीपने मुनियान यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केलीय. आरोपी संदीप जैस्वालला न्यायालयात हजर केले असता 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली.


जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी 


दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत जमिनीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झालीय. दोन गटातील सदस्यांमध्ये फ्री स्टाईल राडा झाला. त्यात मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग दिसून आला. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस स्टेशनमध्ये 40 ते 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. शासकीय जमिनीवर असलेल्या घराच्या वादातून ही हाणामारी झाल्याचं समजत आहे.