हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर : काही महिन्यांपूर्वी  शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली होती. आज तोच टोमॅटो भाव खात आहे. टोमॅटो हब म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पुण्याच्या जुन्नरमधील गायकर कुटुंबांना तर याच टोमॅटोनं करोडपती बनवले आहे. गायकर यांनी बारा एकरात टोमॅटोची लागवड केली. उन्हाळी हंगामासाठी त्यांनी लाखो रुपये खर्च केला. तेंव्हा कुठं जाऊन एक रुपयाच्या बदल्यात दोन रुपयांचा त्यांना फायदा झाला. मात्र, गेल्या तीन वर्षांत याच टोमॅटोचं डोळ्यादेखत लाल चिखल झाल्यानं, त्यांच्या हाताला मुद्दल ही लागली नव्हता. आता मात्र, त्यांना विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे आणि नगर जिल्ह्यातील सरहद्दीवर वसलेले हे छोटंसं गाव म्हणजे पाचघर गाव. काळीभोर जमीन आणि वर्षभर पाणी. यामुळे घरटी कांदा आणि टोमॅटोची शेती केली जाते. गावात जिकडे पाहावं तिकडे टोमॅटोची लागवड. याचमुळे टोमॅटोने येथील अनेकांचं नशीब पालटले. गायकर कुटुंबाचेही अशाच प्रकारे नशीब पालटले. पाचघरच्या ईश्वर गायकर यांची 18 एकर बागायती जमीन आहे. त्यातील 12 एकरवर त्यांनी त्यांचे वडील तुकाराम गायकर व पत्नी सोनाली यांच्या मदतीने टोमॅटोची शेती केली आणि त्यांचं नशीब बदललं आहे. 


टोमॅटो शेतीमुळे 100 पेक्षा जास्त महिलांना रोजगार मिळाला 


गायकर यांच्या टोमॅटो शेतीमुळे परिसरातील 100 पेक्षा जास्त महिलांना रोजगार मिळाला आहे. टोमॅटो बागेची मशागत, तोडणी, क्रेट भरणे, फवारणी आदींचे व्यवस्थापन त्यांची सुनबाई सोनाली गायकर करते तर मुलगा ईश्वर गायकर विक्री व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन करत आहेत. चांगला बाजार मिळाल्याने मागील तीन महिने केलेल्या कष्टाची चीज झाले आहे.


टोमॅटो पिकामुळे लॉटरी लागली


गायकर यांना यंदा टोमॅटो पिकाची लॉटरीच लागली आहे. मागील महिना भरापासून आज पर्यत त्यांनी 17 हजार टोमॅटो क्रेट विक्रीतून 2 कोटी 80 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. नारायणगाव त्यांच्या टोमॅटो क्रेट ला 2400 रुपये(20 किलो क्रेट) भाव मिळाला. मागील महिना भरात त्यांना क्रेट ला प्रतवारीनुसार 1000 ते 2400 रुपये भाव मिळालाय. गायकर यांच्या सारखे तालुक्यातील अनेक शेतकरी आहे. हे टोमॅटो मूळे ते करोडपती झाले आहेत.
टोमॅटोचे वाढलेले भाव आवाक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने टोमॅटो खरेदी करून बाजारात विक्री करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सध्या टोमॅटो पिकाची आवक बाजारात कमी झाली आहे त्यामुळे टोमॅटोचे भाव हे गगनाला भिडले आहेत. मात्र, सरकारने जर असाच भाव ठेवला तर याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल.