फुग्यामुळे 4 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू; हट्ट जीवावर बेतला
फुगे फुगवणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट होवून एका चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. नागपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
Nagpur Balloon Cylinder Explosion : रंगीबेरंगी फुगे म्हणजे लहान मुलांच्या आकर्षणाचा दिवस. रस्त्यात फुगेवाला दिसला की मुलं पालकांकडे फुगे खरेदी करण्याचा हट्ट धरतात. मात्र, हाच फुगे खरेदीचा हट्ट एका चिमुरड्याच्या जीवावर बेतला आहे. गॅसच्या फुग्यामुळे 4 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. नागपुरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
फुगे फुगवणाऱ्या सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याने नागपुरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. नागपूरच्या सदर पोलीस स्टेशन हद्दीत फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. तर, त्याच्यासह असलेल्या दोन तरुणी जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे नागपुर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
सिझन आसिफ शेख असे मृत चार वर्षीय मुलाचे नाव आहे. तर, फारिया हबीब शेख (वय 28 वर्षे) आणि अनमता हबीब शेख (वय 24 वर्षे) अशी जखमी तरुणींची नावे आहेत. या दोघीही मृत सिझन याच्या मावशी आहे. सिझन हा आपल्या दोन्ही मावशींसह बाहेर गेला होता. यावेळी बिशप ग्राउंड लगतच्या रोडवर एक फुगे विक्रेता फुगे विकत होता. फुगेवाल्याला पाहून सुझेन याने मावशींकडे फुगे खरेदीचा हट्ट केला. यावेळी हे तिघेही फुगेवाल्याजवळ थांबून फुगा खरेदी करत असताना अचानक विचित्र घटना घडली. फुगे फुगवणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने सिलेंडर हवेत उडाला.
या दुर्घटनेत सिझेन याला गंभीर दुखापत झाली. तातडीने सिझेन याला उपचारकरता मेयो रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी सिझेन याला मृत घोषित केले. या दुर्घटनेत फारिया आणि अनमता या दोघी जखमी झाल्या आहेत. या दोघींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
खेळता खेळता चिमुरडी खाडीत पडली
डोंबिवली पश्चिम येथील कुंभारनपाडा खाडी किनारी परिसरात एक लहान चिमुकली खेळता खेळता खाडीत पडली. तिला वाचण्यासाठी तिच्या आजोबांनी देखील उडी मारली.मात्र पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने दोघेही खाडीच्या पाण्यात दूरवर वाहून गेले. डोंबिवली अग्निशमन दलाचे जवान आणि विष्णूनगर पोलीस यांनी संयुक्तपणे प्रयत्न करत यांच्या मृतदेहांचा शोध घेतला.
मांजाना गळा चिरला गेल्यानं पोलिसाचा मृत्यू
मुंबईतील दिंडोशी पोलिस ठाण्यातले पोलीस शिपाई समीर सुरेश जाधव, यांचा मांजाना गळा चिरला गेल्यानं मृत्यू झाला. ते अवघे 37 वर्षांचे होते. दिवसाची सेवा पूर्ण करुन ते दुपारी बरळीतल्या घरी दुचाकीवरुन जात असताना, सांताक्रुजमध्ये ही दुर्घटना घडली. त्यांना तातडीनं सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.