पुण्यात पत्नीची हत्या करण्याच्या हेतून पतीने तिला चक्क ब्लेडचे तुकडे गिळायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवणे येथे ही घटना घडली आहे. पतीने कॅल्शिअम कॅप्सूलमध्ये ब्लेडचे तुकडे मिसळले आणि पत्नीला ते गिळायला लावलं. यामुळे महिलेच्या घशाला जखमा झाल्या आहेत. पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पतीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. उत्तमनगर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमनाथ साधू सपकाळ असं आरोपी पतीचं नाव असून, पीडित पत्नीची ओळख छाया सपकाळ अशी पटली आहे. ऑक्टोबर 2023 ते 8 नोव्हेंबर 2023 दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे आरोपींविरुद्ध घरगुती हिंसाचार आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ पत्नी छाया यांच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. याच संशयातून तो तिचा छळ करत होता. दरम्यान काही महिन्यांपूर्वी सोमनाथचा भाऊ घरी मद्यप्राशन करण्यासाठी आला होता. यावेळी त्यावेळी छायाने सोमनाथशी वाद घातला होता. तुमच्या भावाला त्याला घरी दारु प्यायला बोलावू नका, असं तिने सांगितलं होतं. यानंतर त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. 


यानंतर संतापलेल्या सोमनाथने पत्नीच्या हत्येचा कट आखला. त्याने छाया यांच्या औषधाशी छेडछाड केली. त्याने ब्लेडचे तुकडे केले आणि ते छाया यांच्या कॅल्शिअम कॅप्सूलमध्ये मिसळले. नंतर त्याने छाया यांना ते कॅप्सूल दिलं. कॅप्सूल खाल्ल्यानंतर छाया यांच्या घशाला जखमा झाल्या. तसंच त्यांना इतरही त्रास होऊ लागले. अखेर त्यांनी त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. 


पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करणे, तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी सोमनाथला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी पवार तपास करत आहेत. उपनिरीक्षक शुभांगी पवार यांनी सांगितले की, वैद्यकीय तपासणी सुरू असून, अंतिम अहवालांवरून कळेल की ब्लेडचे तुकडे कॅप्सूलमध्ये मिसळले होते की नाही.