प्रेयसीची हत्या करुन बेडमध्ये लपवला मृतदेह, त्यानंतर रोज...पालघरमधील हत्याकांडमुळे पोलिसही चक्रावले
Crime News: पालघरमध्ये (Palghar) तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या करुन मृतदेह पलंगात लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक आठवड्यापूर्वी ही हत्या झाल्याचा पोलिसांचा (Police) अंदाज आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
Crime News: दिल्लीमधील श्रद्धा वालकर (Delhi Sharaddha Walkar Murder) हत्या प्रकरणामुळे देश हादरलेला असताना याच्याशी साम्य असणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत. दिल्लीमध्ये एका प्रियकराने प्रेयसीची हत्या करुन फ्रीजमध्ये लपवून ठेवल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ माजलेली असताना आता पालघरमधीलही (Pallghar News) एक घटना समोर आली आहे. लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने प्रेयसीची हत्या (Murder) करुन मृतदेह पलंगात लपवून ठेवला होता. पोलिसांनी (Police) आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
पालघरच्या तुळींज येथे हे प्रेमी युगूल लिव्ह-इनमध्ये राहत होतं. दोघांमध्ये रोज काही ना काही कारणास्तव भांडण होत होतं. त्यातच एका वादात संतापलेल्या प्रियकराने प्रयेसीची हत्या केली आणि घरातील पलंगात तिचा मृतदेह लपवून ठेवला. पोलिसांनी आरोपीला पळून जाताना मध्य प्रदेशच्या नागदा येथे ट्रेनमधून पकडलं.
तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नागरकर यांनी घटनेची माहिती देताना सांगितलं आहे की, "आमच्या पोलीस ठाण्यात एका हत्या प्रकरणाची नोंद झाली आहे. मेघा ही नर्स म्हणून काम करत होती. सोमवारी तुळींज येथील आपल्या घरात तिचा मृतदेह आढळला. घऱातून दुर्गंध येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन चौकशी केली असता गादीत गुंडाळलेला तिचा मृतदेह पलंगात लपवून ठेवला असल्याचं निष्पन्न झालं".
गेल्या आठवड्यात ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस चौकशीत आरोपीने सांगितलं की, दोघेही लिव्ह-इनमध्ये राहत होते. दोघांमध्ये नेहमी भांडण होत होतं. यादरम्यान रागात हत्या केल्यानंतर मेघाचा मृतदेह पलंगात लपवून ठेवला होता. याप्रकरणी पोलीस चौकशी सुरु होण्याची भीती असल्याने तो रोज सामान विकत होता.
आरोपीच्या दाव्यानुसार, आपण बेरोजगार असल्याने रोज प्रेयसीसह भांडण होत होती. तरुणाने हत्या केल्यानंतर आपल्या बहिणीला मेसेज केला होता. तसंच घर सोडून पळून जाण्याआधी सर्व फर्निचर विकून टाकलं होतं. पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.