नागपुरात पुन्हा एकदा उड्डाणपुलावरून खाली कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पारडी उड्डाणपुलावर शनिवारी दुपारी ही घटना घडली. तरुण वेगात दुचाकी चालवत असताना नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर दुचाकी पुलावरच राहिली, मात्र तरुण 50 फूट खाली कोसळला. स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं, पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार चिखलीवरून पारडीच्या दिशेने जात होता. यावेळी तो वेगाने दुचाकी चालवत होता. यावेळी नियंत्रण सुटल्याने दुचाकी उड्डाणपुलाच्या कठड्यावर जाऊन आदळली. धडकेनंतर दुचाकी पुलावरच राहिली, मात्र तरुण उड्डाणपुलाखाली कोसळला. सुमारे 50 फूट उंचावरून खाली पडल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता.


अपघानंतर तेथे असणाऱ्या नागरिकांनी जखमी तरुणाला उचलून जवळच्या भवानी रुग्णालयात नेलं होतं. मात्र, डॉक्टरानी त्याला मृत घोषित केलं.


विशेष म्हणजे यापूर्वीही नागपूरच्या सक्करदरा तसेच सीताबर्डीच्या उड्डाणपुलावरून खाली कोसळून अनेक दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नागपूरच्या उड्डाणपुलावरील कमी उंचीच्या संरक्षण भिंती दुचाकी स्वरांसाठी धोकादायक झाल्याचा विषय यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.