वंदे भारतमध्ये (Vande Bharat) प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या जेवणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. याचं कारण एका प्रवाशाला जेवणात चक्क झुरळ सापडलं आहे. दोन महिन्यात घडलेली ही दुसरी घटना असल्याने वंदे भारतमधील जेवणावरुन टीका होत आहे. प्रवाशाने ट्रेनमध्ये देण्यात आलेल्या जेवणातील डाळीत झुरळ सापडल्यानंतर एक्सवर फोटो, व्हिडीओ शेअर करत तक्रार केली आहे. यानंतर ही पोस्ट व्हायरल झाली असून नेटकरी त्यावर व्यक्त होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिक्की जेसवानी वंदे भारतने प्रवास करत होता. शिर्डी येथून तो मुंबईला येत होता. यावेळी ट्रेनमध्ये देण्यात आलेल्या जेवणात त्याला झुरळ सापडलं. यानंतर त्याने आयआरसीटीसीकडे लेखी तक्रार दिली आहे. दरम्यान त्याने एक्सवर शेअर केलेले फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. 


"आम्ही वंदे भारत ट्रेनने शिर्डीवरुन मुंबईला येत आहोत. यावेळी आम्हाला देण्यात आलेल्या जेवणातील डाळीत एक मृत झुरळ सापडलं आहे. मॅनेजरनेही याला दुजोरा दिला आहे. आम्ही याप्रकरणी लेखी तक्रार दिली आहे. हा नवा भारत आहे," असा संताप प्रवाशाने व्यक्त केला आहे. 



दुसऱ्या एक्स वापरकर्त्याने लेखी तक्रारीची छायाचित्रे आणि व्हायरल व्हिडिओ ट्विट केला ज्यामध्ये प्रवासी ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेबद्दल तक्रार करताना दिसत आहेत. एका फोटोत डाळीत मृत झुरळ तरंगत असल्याचं दिसत आहे. 


X वरील पोस्टला उत्तर देताना, IRCTC ने लिहिलं आहे की, "सर, तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल मनापासून खेद आहे. या प्रकरणाकडे अतिशय गांभीर्याने पाहिलं गेलं आहे. सेवा पुरवठा करणाऱ्याला दंडही ठोठावण्यात आला आहे. तसंत सेवा देणाऱ्यांच्या स्वयंपाकघरातील युनिटची पूर्ण तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना नियुक्त केलं आहे".