एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल असा प्रकार साताऱ्यातील दुष्काळी माण तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथे घडला आहे. 27 वर्षापूर्वी गायब झालेला मुलगा मीच असल्याचं दाखवत एका भोंदू बाबांना एका वृद्ध महिलेची संपूर्ण संपत्ती लाटल्याचा प्रकार घडला आहे. या भोंदू बाबाच्या मुस्क्या पोलिसांनी आवळल्या आहेत. पण नेमका हा प्रकार घडला तरी कसा हे जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्याच्या दहिवडी पोलिसांच्या ताब्यात असलेला हा भोंदूबाबा... हरवलेला मुलगा 27 वर्षांनी परत आल्याचं सांगत त्यानं एका वृद्धेला फसवण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदी बुद्रूक गावात भिक्षा मागण्यासाठी आलेल्या या भोंदूबाबाला गावातील द्वारकाबाई कुचेकर वृद्धेचा मुलगा 1997मध्ये घरातून निघून गेल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन त्यानं महिलेला आपणच हरवलेला मुलगा सोमनाथ असल्याची बतावणी केली.


वृद्ध महिलेच्या नावावर तीन एकर जमीन असल्याचं समजल्यानंतर या बाबाने चित्रपटाच्या कथेला लाजवेल असे कथानक रचून 27 वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला मुलगा मीच असल्याचं या वृद्ध महिलेला पटवून दिलं. हा भोंदू बाबा एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने गायब झालेल्या सोमनाथ कुचेकर या मुलाच्या नावाने शाळा सोडल्याचा दाखला, रहिवाशी दाखला मिळवला आणि त्या आधारे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेत खाते देखील काढले.


द्वारकाबाई कुचेकर यांचा 2023 मध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मुलींनी गावात येऊन त्यांचं वर्षश्राद्ध केलं. त्याचवेळी सोमनाथनंही त्या वृद्धेचं वर्षश्राद्धाचं आयोजन केलं होतं. ही बाब समजल्यानंतर द्वारकाबाईंच्या मुलींनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या तोतया मुलाची चौकशी केली असता त्याचं बिंग फुटलं.


महिलेची 3 एकर जमीन आणि संपत्ती हडपण्यासाठी त्यानं ही उठाठेव केली होती. त्याचा हा डाव यशस्वीही झाला होता. पण वर्षश्राद्घाच्या कार्यक्रमात त्या तोतया मुलाचं बिंग फुटलंय. संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तोतयाला आता तुरुंगाचे गज मोजावे लागणार आहेत.