लॉकडाऊन असल्याने खेळताना दीड वर्षांचा बालकाचा चौथ्या मजल्यावरुन कोसळून मृत्यू
नागपूर जिल्ह्यातील वाडीजवळच्या दवलामेटी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे.
नागपूर : जिल्ह्यातील वाडीजवळच्या दवलामेटी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. एका दीड वर्षीय बालकाचा चौथ्या माळ्यावरून खाली कोसळून मृत्यू झाला. दवलामेटी परिसरात हिल टॉप कॉलनीत एक चार मजली फ्लॅट स्कीम आहे. चौथ्या माळ्यावर सलामे कुटुंबीय राहतात. सध्या कोरोनाची भीती आणि लॉकडाऊन असल्याने मुलांचं बाहेर खेळणं बंद असल्याने सलामे कुटुंबातील दोन्ही मुले बाल्कनीमध्ये खेळायची.
दीड वर्षाचा वेद तर सतत बाल्कनीमध्येच राहायचा. काल दुपारी वेदची आई त्याला जेवण भरवत असताना चिमुकला वेद स्टुलावर बसला होता. अचानक तो बाल्कनीच्या भिंतीजवळ स्टुलावर उभा झाला आणि तोल जाऊन खाली कोसळला. जबर जखमी झालेल्या वेदला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत वेदचे वडील सुरेश सलामे हे मेघालय येथे बीएसएफमध्ये जवान म्हणून कर्तव्यावर आहेत. त्यामुळे मृतकाची आई मेघा दवलामेटीमध्ये चार वर्षांची मोठी मुलगी आणि दीड वर्षीय मृतक वेद यांच्यासह राहत होती. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.