पुणे : शहरात भरदिवसा कोयता गॅंग सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. या गॅंगकडून दहशत फसरवण्याचा प्रयत्न भरदिवसा दिसून आला. हातात कोयते घेऊन आलेल्या चौघांनी लष्कर परिसरातील व्यावसायिकांना हप्त्यासाठी धमकावले. दर महिन्याला हप्ता देण्याची मागणी करून दुकानांची तोडफोड केली. या गॅंगमुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लष्कर पोलीस ठाण्यात या गॅंगविरोधात तक्रार करण्यात आली आहे. आदित्य तथा मन्या भोसले आणि त्याच्या तीन साथीदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या सगळ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य (२८) सुशील दिनेश भडकवाल (२७, दोघे राहणार भवानी पेठ), संतोष गायकवाड (३५, मोदीखाना), जोन्स (३५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आनंद जवारे यांचे लष्कर परिसरात न्यूयॉर्क वाईन्स नावाचे दुकान आहे. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चार जण दुकानात आले. त्यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्याचवेळी त्यांनी सिमेंटचा ब्लॉक दुकानाच्या काचेवर टाकला आणि नुकसान केले. २ लाख रुपये द्या अन्यथा जीवे मारु अशी धमकी दिल्याचे, त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 


तसेच जवारे यांच्या दुकानाचे नुकसान केल्यानंतर या गॅंगने दुसऱ्या एका दुकानाची तोडफोड केली. त्यानंतर आणखी एका दुकानदाराला कोयता उगारुन धमकावले. ते एवढ्यावर थांबले नाही. त्यांनी पुन्हा दोन दुकानदारांना धमकावले आणि खंडणीची मागणी केली. याप्रकारामुळे लष्कर परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसले आहे.