रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगलीत आज होणाऱ्या शहीद मॅरेथॉन दौडमध्ये सहभागी होण्यासाठी साताऱ्यातील तीन तरुण शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सातारा ते सांगली असं १३० किलोमीटर अंतर धावत आले. उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांच्यासोबत चक्क एक भटका कुत्राही धावत सांगलीला आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे मॅरेथॉनपटू धावले ते २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत धावला भटका कुत्रा...शहीद अशोक कामटे स्मृती फाऊंडेशनच्या वतीने रविवारी सांगलीत शहीद मॅरेथॉन आयोजित करण्यात आलीय. त्यात सहभागी होण्यासाठी निरंजन पिसे, मारुती चाळके, पुंडलिक नाईक हे मॅरेथॉनपटू साताऱ्याहून निघाले. शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी सातारा ते सांगली अशी दौड करायचं त्यांनी ठरवलं. 


साताऱ्यातील पवई नाक्याहून त्यांनी दौड सुरू केली. त्यावेळी अचानक एक भटका कुत्रा देखील मॅरेथॉनपटूंच्या मागे पळायला लावला. काही केल्या तो त्यांचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. त्यांनी १३० किलोमीटर अंतर धावत कापलं, त्यांच्यासोबत हा कुत्राही अगदी ऊन वाऱ्याची पर्वा न करता तो धावत होता. 


सातारा ते सांगली दौड करून या धावपटूंनी दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहिली. अर्थात या भटक्या कुत्र्याने देखील यानिमित्तानं शहिदांना अनोखी श्रद्धांजली वाहिली. एखाद्या मुक्या प्राण्याने शहिदांबद्दल आपलं प्रेम आणि आपुलकी व्यक्त केल्याची ही अद्वितीय घटना म्हणावी लागेल.