नांदेडमध्ये परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या हेतूने एका विद्यार्थ्याने चक्क 7 उत्तरपत्रिकांवर 500 रुपयांच्या नोटा चिकटवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात हा प्रकार घडला आहे. विद्यार्थी बीसीए प्रथम वर्षात शिकत होता. यानंतर विद्यार्थ्याची चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने उत्तीर्ण होण्याच्या हेतूनेच आपण हे कृत्य केल्याची कबुली दिली. यानंतर संबंधित विद्यार्थ्यावर पुढील 4 परीक्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविद्यालयीन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याने चक्क 7 उत्तरपत्रिकांवर 500 रुपयांच्या नोटा चिटकवल्या होत्या. या विद्यार्थ्यावर विद्यापीठाने कारवाई केली आहे. नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेत 1843 विद्यार्थी कॉपी करताना आढळले होते. त्यांची सर्व संपादणूक (व्होल परफॉर्मन्स) रद्द करण्याची कारवाई विद्यापीठाने केली. 


यंदा झालेल्या उन्हाळी परीक्षेत नांदेड, लातूर , परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात एकूण 1843 विद्यार्थी कॉपी करताना दक्षता पथकाला आढळले होते. त्या सर्व विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द करण्यात आली. 


त्यातच नांदेड येथील बीसीए प्रथम वर्षातील एका विद्यार्थ्याने सर्व 7 विषयाच्या उत्तरपत्रिकांवर 500 च्या नोटा चिटकवल्या. पास करण्याच्या उद्देशाने त्याने हा कारनामा केला. याबाबत त्या विद्यार्थ्याला बोलावून चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने नोटा चिटकवल्याचं कबूल केलं. त्यावरून त्याची संपादणूक रद्द करुन पुढील चार परीक्षेसाठी बंदी घातली आहे अशी माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली आहे.


"उन्हाळी 2023 च्या परीक्षेचं नियोजन करत असताना परीक्षा पारदर्शी आणि सुव्यवस्थित व्हाव्यात यासाठी नियोजन करण्यात आलं होतं. त्यात प्रत्येक केंद्रावर सह-केंद्रप्रमुखाची नियुक्ती करण्यात आली होती. तसंच 58 दक्षता पथकं नियुक्त होती. कॉपी करताना आढळलेल्या विद्यार्थांना बोलावून त्यांची पुराव्यानशी चौकशी करण्यात आली," अशी माहितीही दिगंबर नेटके यांनी दिली.