पुण्यात दुपारची झोपमोड करणाऱ्याचा मर्डर! भाडेकरूने घरमालकाला टाकीत बुडवून संपवलं
पुण्यात दुपारी हॉर्न वाजवून झोपमोड करणाऱ्या घरमालकाची भाडेकरुनेच हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. हडपसर रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात ही घटना घडली आहे.
पुण्यात दुपारी झोपमोड केल्याने भाडेकरुनेच आपल्या घरमालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हडपसर रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने पाण्याच्या टाकीत बुडवून मालकाला ठार केलं. घरमालकाच्या कुटुंबाने ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असून, संशयित आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष राजेंद्र धोत्रे असं भाडेकरुचं नाव आहे. तर दादा ज्ञानदेव घुले अशी घरमालकाची ओळख पटली आहे. दादा ज्ञानदेव घुले यांनी घरासमोर दुपारी जोरात हॉर्न वाजवल्याने संतोष राजेंद्र धोत्रे याची झोपमोड झाली. या संतापात त्याने दादा घुले यांना मारहाण केली. नंतर त्याने पाण्याच्या टाकीत बुडवून त्यांना ठार केलं.
आरोपी धोत्रे हा घुले यांच्या मालकीच्या चाळीत भाड्याने राहत होता. सोमवारी दुपारी धोत्रेने मद्यप्राशन केलं होतं. मद्यप्राशन केल्यानंतर तो झोपायला घरात गेला. यावेळी दादा घुले चाळीसमोर जोरजोरात हॉर्न वाजवत होते. हॉर्नचा आवाज ऐकून धोत्रेची झोपमोड झाली. या संतापात त्याने घुले यांच्याशी वाद घातला आणि मारहाणही केली. यानंतर त्याने पार्किंगमधील पाण्याच्या टाकीत बुडवून घुले यांची हत्या केली.
दादा घुले रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी सुरु केली असता दादा घुले आणि संतोष धोत्रे यांच्यात भांडण झाल्याचं समजलं. पोलिसांनी अधिक तपास केला असता त्यांना दादा घुले यांचा मृतदेह सापडला. चौकशीदरम्यान दादा घुले यांची हत्या झाल्याचं उघड झालं. यानंतर संशयाची सुई धोत्रेकडे गेली आणि पोलिसांनी त्याला अटक केली. लोणी काळभोर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.