Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील डोंगर शेवली गावाला लागून असलेल्या सोमनाथ मंदिरामध्ये काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास एक मादा अस्वल आणि तिची तीन पिले मंदिराच्या परिसरात फिरताना दिसली. एवढेच काय तर महादेवाच्या मंदिराचं चॅनल गेट उघडून थेट मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. अस्वलांचे हे देव दर्शन कॅमेऱ्यात कैद झाले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अस्वलांची टोळी मंदिरात शिरली आणि थेट शंकराच्या पिंडीजवळ पोहचली. अस्वलाच्या या टोळीने प्रसादाच्या नारळावर त्यांच्याकडून ताव मारला. हा सर्व प्रकार मंदिरामध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झालाय. हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात चांगलीच धास्ती निर्माण झाली.


डोंगर शेवली हे गाव ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असल्याकारणाने बऱ्याचदा गावामध्ये पाणी पिण्यासाठी जंगली प्राणी येत असतात. परंतु आता जास्त वावर असलेल्या मंदिरामध्ये च अस्वल दिसल्या कारणाने परिसरात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन काहीतरी नियोजन करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.


सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी लावले गाढवाचे लग्न 


पेण तालुक्यातील वाशी खारेपाट परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्थानिकांनी गाढवाचे लग्न लावले. या परिसराला गेली अनेक वर्षे पाण्याची समस्या भेडसावते आहे. त्यासाठी स्थानिकांनी डिसेंबर महिन्यात उपोषण केले होते त्यावेळी. महिनाभरात पाणी योजनेचे काम सुरू करण्याचे आश्वासन सरकारने सभागृहात दिले होते. परंतु अद्याप या कामाला सुरुवात झालेली नाही. सरकारला आपल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख विष्णू पाटील यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.


साताऱ्यातील महाविद्यालयात अनेक विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला


सातारा  जिल्ह्यातील रामनगर येथील एका खाजगी महाविद्यालयाचा परिसरात इमारतीवर असलेल्या पोळ्यातील मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात पन्नास हून अधिक विद्यार्थीना मधमाशांनी हल्ला करून जखमी केले आहे. या घटनेनंतर तात्काळ महाविद्यालय प्रशासनाने परिसर पूर्णपणे मोकळा केला. अनेक वर्षापासून असणाऱ्या या आगी मव्हाचे पोळे हटवण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. यामधील दोन विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मधमाशांनी चावा घेतल्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.