नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : एक दोन नव्हे तर तब्बल, १३ मुलींना लग्नाचं आमिष दाखवून एका तरूणाने फसवलं आहे. या मुलींना फसवून तो त्यांच्याकडून, लाखो रूपये घेऊन पोबारा करत होता. या ठकसेनचं नाव कृष्णा चंद्रसेन देवकाते असं आहे. हडपसर पोलिसांनी त्याला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. १३ तरूणींपैकी एका तरूणीने तक्रार केल्यानंतर पोलिसांना त्याला अटक करण्यात यश आलं आहे. जीवनसाथी वेबसाईटवर नाव नोंदवून तो मुलींकडून पैसे उकळण्यासाठी लग्नाच्या नावाने साफळा रचत होता. लग्न या विषयावर भावनिक होणाऱ्या तरूणींनी, सावध राहण्याची गरज असल्याचं यात दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृष्णा चंद्रसेन देवकाते याने अनेक वेळा नावं बदलवून मुलींची फसवणूक केली आहे, कृष्णा देवकाते याची आणखी काही प्रकरणं समोर येण्याची शक्यता आहे. अनेक मुलींना फसवून देवकाते पोबारा करायचा, त्याच्या विरोधात कोणतीही तरूणी तक्रार दाखल करत नसल्याने त्याचं चांगलंच फावलं होतं, अखेर एका तरूणीने त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार देण्याची हिंमत दाखवल्याने, पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.


बनावट नावाचा वापर करून पुणे, ठाणे, नवी मुबई या शहरात त्याने १३ मुलींना फसवलं आहे. जीवनसाथी या वेबसाईटवर लग्नासाठी नाव नोंदणी करून तो मुलींना फसवत होता. वेळोवेळी कारणे देऊन तो पसरा होत होता. हडपसरमधील एका तरुणीकडून त्याने पैसे घेतले, मात्र तिच्या लक्षात आल्यावर तिने पोलिसात तक्रार दिली.