मुंबई : भाजप नेते जय भगवान गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजचे छत्रपती शिवाजी महाराज असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या पुस्तकाच्या नावावरुवन आता पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भाजप नेते जयभगवान गोयल यांच्या 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' नावाच्या पुस्तकानं नवा वाद निर्माण झाला आहे. भाजप मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस शाम जाजू यांच्या हस्ते या पुस्तकाचं शनिवारी प्रकाशन झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पुस्तकात मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि खासदार संभाजीराजेंनी या तुलनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही असंही राजे म्हणाले आहेत.



काँग्रेसनंही या वादात उडी घेतली असून अशी तुलना निषेधार्ह असल्याची टीका सचिन सावंत यांनी केली आहे. भाजपनं या प्रकरणात वेगळी भूमिका घेतली आहे. पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आलेला नाही अशी भूमिका भाजपनं घेतली आहे.


शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या पुस्तकावरुन थेट छत्रपतींच्या वंशजांनाच प्रश्न केला आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, सातारा गादीचे वारसदार श्रीमंत ऊदयनराजे, श्रीमंत शिवेंद्रराजे, कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का? शिवरायांच्या वंशजांनो बोला..काहीतरी बोला.' 



त्यानंतर छत्रपती संभाजी राजे यांनी देखील संजय राऊतांना कडक शब्दात उत्तर दिलं आहे.




नेत्यांचं कौतुक करणं यात गैर नाही. पण कौतुक करण्याच्या नादात कुणाच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यायला हवी अशी अपेक्षा शिवप्रेमींमधून व्यक्त केली जाते आहे.